उमरग्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा
उमरगा, ता. २३ (बातमीदार) : येथील नगर पालिकेसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मंगळवारी (ता. २१) धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. दिवसभर विविध सामाजिक संघटनांच्या वतीने महामानवाला अभिवादन करण्यात आले.
त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर बुद्धपूजा व २२ प्रतिज्ञांचे पठण करण्यात आले. धम्मचारी प्रज्ञाजित, धम्मचारी विबोध, धम्ममित्र शाक्यदीप कांबळे, वगरसेन कांबळे आणि उत्तम गायकवाड यांनी पाली पूजेचे पठण केले. या वेळी सहदेव सोनकांबळे, फुलचंद कांबळे, कमलाकर सूर्यवंशी व गुणरत्न भालेराव उपस्थित होते. दुपारच्या सत्रात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने प्रा. सुधीर कांबळे यांचे विशेष व्याख्यान पार पडले. या वेळी गावोगावी वर्षावास कार्यक्रम आयोजित करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी पँथर्स नेते हरीश डावरे, एस. के. कांबळे, प्रा. शिवराम अडसूळे, तालुकाध्यक्ष उमेश सुरवसे, संगीता कांबळे आदींची उपस्थिती होती. तसेच वंचित बहुजन आघाडीचे रामभाऊ गायकवाड, अॅड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्या अॅड. शीतल चव्हाण, जिजाऊ ब्रिगेडच्या रेखा पवार, धीरज बेळंबकर, जवळगा बेटच्या माजी सरपंच उषा गायकवाड, दिलीप भालेराव, श्रीधर सरपे आदी मान्यवरांनी पुतळ्यास अभिवादन केले.