धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करा
जिंतूर तालुक्यातील सकल धनगर समाज बांधवांची मागणी
जिंतूर, ता. ८ (बातमीदार) : धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी स्वतंत्र कायदा करावा, यासह विविध मागण्यांसाठी जिंतूर तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार शीतल कच्छवे यांना सोमवारी (ता. सात) निवेदन देण्यात आले.
धनगर समाजाच्या हक्कांसाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू असून, आमदार गोपीचंद पडळकर व धनगर समाज विचारमंचच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर आक्रोश आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून जिंतूर तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी निवेदन देण्यात आले.
संत बाळूमामा देवस्थानासाठी स्वतंत्र कायदा करून २१ विश्वस्तांपैकी किमान ११ विश्वस्त आणि अध्यक्ष हे मेंढपाळ समाजातील असावेत, अशी मागणी करण्यात आली. तसेच मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील नवीन कनेक्टिंग लिंकला हुतात्मावीर सिंगरोबा धनगर यांचे नाव देण्यात यावे. मुंबईतील चर्चगेटला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांचे नाव देण्यात यावे, अशा मागण्यांचाही निवेदनात समावेश आहे. मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. निवेदनावर गजानन वऱ्हाड, प्रा. डॉ. प्रभाकर वजीर, ज्ञानेश्वर मार्कंड, ओंकार पुंजारे, गजानन श्रावणे, गजानन शेवाळे, प्रदीप पुंजारे, गोपाळ आव्हाड, दीपक शेवाळे, नवनाथ शेवाळे, सुनील वैद्य, तुकाराम शेवाळे, अविनाश पुंजारे, बालाजी शेवाळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
-----
तहसीलदारांकडे निवेदन
पालम : येथील धनगर समाजाच्या वतीनेही अनुसूचित जमाती आरक्षणाची मागणी तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे निवेदनद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर गणेशराव घोरपडे, विजय घोरपडे, बाळासाहेब ढोले, ज्ञानराज घोरपडे, मंगेश घोरपडे, विजय गाणार, अतुल धुळगुंडे, रावसाहेब शिंदे, नंदकुमार धुळगुंडे, रामेश्वर सुरनर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.