धाराशिवच्या राजकारणात ‘पाटील फॅक्टर’
डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या विजयाने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत नवचैतन्य
राजेंद्रकुमार जाधव
धाराशिव, ता. २९ ः एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत राजकीय पडझड पाहायला मिळाली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतील सुवर्णकाळानंतर २०१९ आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये जिल्ह्यामध्ये या पक्षाला एकही आमदारकी मिळवता आली नव्हती. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचे खचलेले मनोबल, सत्तेबाहेर राहावे लागल्याची पोकळी यामुळे पक्ष सत्तेच्या राजकारणात बॅकफूटवर गेला होता. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी मिळवलेल्या विजयामुळे जिल्ह्यातील राजकीय समतोलात आणि आगामी समीकरणांमध्ये मोठे बदल घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विधानसभेच्या चार जागा असलेल्या धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पक्षाचे प्रतिनिधित्व शून्य झाले होते. अशा काळात नेतृत्वाच्या अभावात पक्षाला हक्काचा मंच मिळवून देण्यात डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अकरा महिन्यांपूर्वी डॉ. पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर धाराशिव नगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवून आठ नगरसेवक निवडून आणले आणि नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवून आपली संघटन क्षमता सिद्ध केली होती. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यात पक्ष संघटन वाढीसाठी प्रयत्न सुरूच ठेवले होते. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून पक्षाकडून उमेदवारी मिळवून त्यांनी विजय मिळविल्यामुळे आता जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना हक्काचा लोकप्रतिनिधी मिळाला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. डॉ. पाटील यांच्या विजयाने जिल्ह्यातील कार्यकर्त्यांत नवी ऊर्जा निर्माण झाली आहे.
एकेकाळी पडझड झालेल्या धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आता या निवडणुकीत मिळालेल्या विजयामुळे उभारी घेण्याच्या तयारीत आहे. डॉ. पाटील यांच्या रूपात जिल्ह्याला मिळालेले हे यश आगामी काळात राजकीय समीकरणे बदलणारा ठरण्याची शक्यता आहे. या यशामुळे जिल्ह्याच्या राजकारणात आता शरद पवार फॅक्टर पुन्हा एकदा प्रभावीपणे पुनरागमन करताना दिसत आहे.
विधानसभेच्या २०१९ मधील निवडणुकीवेळी डॉ. पाटील यांनी उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र त्यांना ऐनवेळी उमेदवारी मिळविण्यापासून वंचित राहावे लागले होते. मात्र पदवीधर मतदारसंघातून पक्षाकडून उमेदवारी मिळविण्याबरोबर विजयही मिळविण्यात त्यांना यश आले. त्यांच्या या विजयामुळे जिल्ह्यात पक्षसंघटन वाढीला बळ मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
.......................
((चौकट))
मराठवाड्यात धाराशिवचे वर्चस्व
धाराशिव हा भौगोलिक व संख्यात्मकदृष्ट्या लहान जिल्हा असला तरी मराठवाड्याच्या राजकारणात या जिल्ह्याचे वजन नेहमीच भारी ठरले आहे. जिल्ह्याबाहेरून किंवा स्थानिक पातळीवर विधान परिषदेच्या विविध मतदारसंघांत धाराशिवच्या तीन व्यक्तींनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. यामध्ये मराठवाडा शिक्षक संघाचे प्रतिनिधित्व करणारे विक्रम काळे, उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधित्व करणारे बसवराज पाटील आणि पदवीधर मतदारसंघातून विजय मिळविणारे डॉ. प्रतापसिंह पाटील हे तिघेही धाराशिव जिल्ह्यातीलच आहेत. त्यामुळे, जिल्ह्यात विधानसभेच्या चार आमदारांची मर्यादा असतानाही शिक्षक, स्थानिक स्वराज्य संस्था, पदवीधर मतदारसंघामुळे धाराशिव जिल्ह्यातून विधिमंडळात प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांची संख्या आता सातवर पोचली आहे.
पहिले तीन धाराशिवचेच
पदवीधर मतदारसंघाच्या या निवडणुकीत पहिल्या तीन क्रमांकाची मते मिळविणारे उमेदवारही धाराशिव जिल्ह्यातीलच आहेत. यामध्ये विजयी झालेले डॉ. प्रतापसिंह पाटील, दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारे सतीश चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि अपक्ष रविराज साबळे हे तिघेही धाराशिव जिल्ह्यातीलच आहेत.
..........................