फोटो क्रमांक-
OSM26B07375
धाराशिव ः बसस्थानकावर गुरुवारी सकाळपासून प्रवाशांची गर्दी असल्याने बसच्या प्रतीक्षेत असलेले प्रवासी.
OSM26B07376
धाराशिव ः बस आल्यानंतर जागा पकडण्यासाठी प्रवाशांची होत असलेली धावपळ.
......................................
परतीची लगबग; बसस्थानक फुल्ल
पुणे, लातूर, तुळजापूरकडे जाणाऱ्या बसला गर्दी; जादा बसही अपुऱ्या
धाराशिव, ता. १२ (बातमीदार) : दिवाळीचा सण आणि भाऊबीजेचा आनंद घेतल्यानंतर गावी आलेल्या विद्यार्थ्यांसह नोकरदारांनी आता परतीचा प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे गुरुवारी (ता. १२) सकाळपासूनच धाराशिव बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. परतीच्या प्रवाशांसह ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांचीही संख्या मोठी असल्याने संपूर्ण बसस्थानक प्रवाशांनी फुलून गेले होते. बसमध्ये जागा मिळविण्यासाठी प्रवाशांची धावपळ सुरू होती.
धाराशिव शहरासह तालुक्यातील अनेकजण नोकरी आणि व्यवसायानिमित्त पुण्यासह अन्य मोठ्या शहरांत वास्तव्यास आहेत. दरवर्षी दिवाळीच्या सणासाठी अनेक जण कुटुंबीयांसह गावी येतात. बुधवारी (ता. ११) भाऊबीजेचा सण झाल्यानंतर गुरुवारपासून त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. त्यामुळे सकाळपासूनच बसस्थानकावर गर्दी वाढली होती.
प्रवाशांची संख्या वाढल्याने बसस्थानकातील आसनव्यवस्था अपुरी पडली. अनेक प्रवाशांना तासनतास उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागली. दिवाळीनिमित्त धाराशिव आगाराने नियमित फेऱ्यांव्यतिरिक्त जादा बसेसची व्यवस्था केली होती. आता परतीच्या प्रवासासाठीही जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, प्रवाशांची संख्या मोठी असल्याने या बसही अपुऱ्या पडत असल्याचे चित्र होते.
विशेषतः ग्रामीण भागात जाणाऱ्या बस वेळेवर उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना ताटकळत थांबावे लागले. बस फलाटावर लागताच जागा पकडण्यासाठी एकच धावपळ उडत होती. खिडकीजवळची जागा मिळविण्यासाठीही प्रवाशांची चढाओढ सुरू होती. याचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना सहन करावा लागला.
.............
((चौकट))
पुण्याकडे जाणाऱ्यांची सर्वाधिक गर्दी
धाराशिव तालुक्यातील बहुतांश जण पुणे, परिसरात नोकरी-व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहेत. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या बसला मोठी गर्दी होती. सुट्यांमुळे तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचीही संख्या वाढली होती. अन्य शहरांतून तुळजापूरकडे येणाऱ्या बस प्रवाशांनी भरून येत होत्या. दिवाळी आणि भाऊबीजेनिमित्त माहेरी आलेल्या महिलांनीही परतीचा प्रवास सुरू केल्याने दिवसभर तुळजापूर, लातूर आणि पुण्याकडे जाणाऱ्या बसेससाठी प्रवाशांची गर्दी कायम होती.