पिकांसोबत शेतमजुरांचाही घास हिरावला

पिकांसोबत शेतमजुरांचाही घास हिरावला
Published on
पान एक सेकंड लीड ----------------- पिकांसोबत शेतमजुरांचा घासही हिरावला धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाचे सावट; खरीप हंगामातील ८५ टक्के पिकांचे नुकसान सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. १९ : यंदा पावसाने ऐन वेळी पाठ केल्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात तब्बल ८५ टक्के खरीप पिके वाया गेली आहेत. या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे केवळ बळिराजाचेच कंबरडे मोडले नाही, तर हंगामाच्या तोंडावर मिळणारा रोजगार हिरावल्या गेल्याने शेतमजूरही अक्षरशः आर्थिक संकटात सापडले आहेत. दरवर्षी खरीप हंगामात सोयाबीन, उडीद, मूग आदी पिकांची काढणी सुरू झाली की ग्रामीण भागात रोजगाराची मोठी पर्वणी यायची. विशेषतः सोयाबीन काढणीच्या काळात पाच ते सात मजुरांचे गट एकत्र येऊन एकरी तीन ते साडेतीन हजार रुपयांचे कंत्राट (गुत्ते) घ्यायचे. यामुळे काही आठवडे मजुरांच्या हाताला निश्चित काम आणि चांगला मोबदला मिळे. या कमाईतून मजुरांना सण-उत्सव साजरे करणे आणि पुढील काही महिन्यांचा संसाराचा गाडा हाकणे सुलभ होत असे. पूर्वी काढणीच्या हंगामात मजुरांची तीव्र टंचाई जाणवायची; मात्र यंदा चित्र पूर्णपणे पालटले आहे. हाताला काम नाही, जगण्याचा प्रश्न ऐरणीवर पावसाच्या लहरीपणाने शेतातील पिके पार वाळून गेली आहेत. काढणीयोग्य एकही पीक हातात उरलेले नसल्याने मजुरांचे गुत्ते आणि रोजंदारी पूर्णपणे ठप्प झाली आहे. ज्या दिवसांत मजुरांच्या हाताला भरघोस काम आणि खिशात पैसा असायचा, त्याच काळात आता जगण्यासाठीण वणवण भटकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. खरीप पिके हातची गेल्याने शेतकऱ्यांकडेही भांडवल उरलेले नाही, परिणामी शेतातील इतर मशागतीच्या कामांसाठीही आता कोणाकडून विचारणा होत नाही. शेतकऱ्यांवरही पीक काढण्याची वेळ पावसाअभावी सोयाबीनसह इतर पिके पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. पीकच हातात नसल्याने मजूर लावून नासाडी झालेल्या पिकाची काढणी करणे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे नाइलाजास्तव आता शेतकरी स्वतः आपल्या कुटुंबीयांसह वाळून गेलेल्या पिकाची काढणी करताना दिसत आहेत. हाताला काम आणि पोटाला अन्न मिळवण्यासाठी ग्रामीण भागातील शेतमजुरांसमोर मोठा यक्षप्रश्न उभा ठाकला असून, शासन या संकटात काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com