OSM26B07284 धाराशिव ः देखभाल, दुरुस्तीअभावी दुरवस्था झालेला कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा.
-------
सिंचनाला हातभार लावणारे बंधारे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत
-----
जिल्ह्यातील ९८३ पैकी ५११ कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरवस्था; ५१ कोटींची गरज
-----
धाराशिव, ता. २६ (बातमीदार) ः जिल्ह्यातील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी निधीची आवश्यकता आहे. गेल्यावर्षीच्या अतिवृष्टीमध्ये ११७ बंधाऱ्यांचे नुकसान झाले. त्याच्या दुरुस्तीसाठी २० कोटींची गरज आहे. जिल्ह्यातील ९८३ पैकी जवळपास ५११ बंधारे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
जिल्ह्यात ३० वर्षांपूर्वी विविध ठिकाणच्या नदी व मोठ्या ओढ्यांच्या पात्रात कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे उभारण्यात आलेले आहेत. या बंधाऱ्यातील पाण्याचा शेतकऱ्यांना सिंचनासाठी, पशुधनाची तहान भागविण्यासाठी उपयोग व्हावा, या दृष्टीने हे बंधारे उभारण्यात आले आहेत. दरवर्षी पावसाळ्यानंतर ऑक्टोबरमध्ये या बंधाऱ्यांना दरवाजे (गेट) बसवून वाहून जाणारे पाणी अडविले जाते. त्यानंतर मे महिन्यात बंधाऱ्याचे दरवाजे काढावे लागतात. बंधाऱ्याच्या परिसरातील लाभार्थी शेतकऱ्यांनी हे दरवाजे काढणे आणि बसविणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत बंधाऱ्यालगत काढून ठेवलेले अनेक ठिकाणचे दरवाजे गायब आहेत. शिवाय अतिवृष्टीमुळे काही ठिकाणच्या बंधाऱ्यांच्या बाजूचे भराव वाहून गेल्यामुळे त्याची दुरवस्था झाली आहे. जिल्ह्यातील ९८३ पैकी जवळपास ५११ बंधाऱ्यांची दुरवस्था झालेली आहे. या सर्व बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी अंदाजे ५१ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व बंधाऱ्यांची पाणीसाठवण क्षमता ८० हजार १४४ टीसीएम आहे. त्यातील पाण्याचा २६ हजार ६७१ हेक्टरला सिंचनासाठी उपयोग होऊ शकतो. मात्र देखभाल, दुरुस्तीअभावी या पाण्यापासून शेती, शेतकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे. जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाकडे या बंधाऱ्यांची देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी आहे.
यंदाच्या पावसाळ्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्यामुळे सर्वच बंधारे कोरडे आहेत. आगामी काळात या बंधाऱ्यांमध्ये पाणी साठवणूक करण्यासाठी दुरवस्था झालेल्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्याची गरज आहे. दुरुस्तीची गरज असलेल्या बंधाऱ्यांचा सध्या सर्व्हे करण्याचे काम सुरू असले, तरी त्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. आतापर्यंत केवळ २० टक्केच्या जवळपास सर्व्हेचे काम झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे ११७ बंधाऱ्यांची दुरवस्था झाली. त्याच्या दुरुस्तीसाठी २० कोटींचा प्रस्तावही तयार केला गेला. मात्र, निधी उपलब्ध झाला नसल्यामुळे बंधाऱ्यांची दुरुस्ती रखडली आहे. त्यामुळे बंधारे असूनही त्याचा पाणी अडविण्यासाठी कसलाच उपयोग होत नसल्याची स्थिती आहे. आघाडी सरकारच्या काळात १३ वर्षांपूर्वी जमीन पातळीपासून तीन मीटर उंचीचा तेथे बंधारा तयार करण्याबाबत चर्चा झाली होती. जेणे करून या तीन मीटर उंचीमध्ये बंधाऱ्यात पाणी साचून त्याचा फायदा भूगर्भातील पाणीपातळीत वाढीसाठी होईल, असा प्रयत्न होता. मात्र, त्यानंतर यावर कोणताही निर्णय झाला नाही. काही ठिकाणी मात्र बंधाऱ्यांना दरवाजे बसवून काही शेतकरी तेथील पाण्याचा वापर करत आहेत. मात्र, हे प्रमाण अत्यंत कमी आहे.
----
((कोट))
जिल्ह्यातील दुरवस्था झालेल्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचा सर्व्हे करण्यात येत आहे. आतापर्यंत २० टक्क्यांच्या जवळपास सर्व्हे करण्यात आला आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टीमध्ये ११७ बंधारे बाधित झाले असून, त्याच्या दुरुस्तीसाठी २० कोटी रुपयांची आवश्यकता आहे.
- सचिन जगताप, कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे, जिल्हा परिषद, धाराशिव