फोटो क्रमांक
OSM26B07243
धाराशिव ः झेंडूच्या फुलांची विक्री करताना शेतकरी.
OSM26B07244
धाराशिव ः दसरा सणाच्या पूर्वसंध्येला सोमवारी शहरात झालेली झेंडूंच्या फुलांची आवक.
............
पिवळ्या, केशरी फुलांनी बहरली बाजारपेठ
धाराशिव, ता. १९ (बातमीदार) : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठ झेंडूच्या पिवळ्या आणि केशरी फुलांनी बहरली आहे. देवी-देवतांच्या पूजनासह वाहने आणि शस्त्रांच्या पूजेसाठी झेंडूच्या फुलांना विशेष मागणी असते. ही बाब लक्षात घेऊन शहरातील ५० हून अधिक विक्रेत्यांनी सोमवारी (ता.१९) फुलांची विक्री सुरू केली. यंदा दर्जेदार आणि मोठ्या आकाराच्या फुलांना किलोमागे १०० रुपये, तर मध्यम व साधारण दर्जाच्या फुलांना ५० ते ८० रुपये भाव मिळत आहे.
दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरासह तालुक्यातील शेतकरी झेंडूची लागवड करतात. मात्र, यंदा पावसाने ओढ दिल्याने अनेक भागांतील झेंडूच्या झाडांची आणि फुलांची अपेक्षित वाढ झाली नाही. सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी फुलशेती चांगल्याप्रकारे जोपासली. त्यामुळे त्यांच्या दर्जेदार फुलांना बाजारात चांगला भाव मिळत आहे. दुसरीकडे, पाणीटंचाईमुळे फुलांची वाढ खुंटल्याने काही शेतकऱ्यांना कमी दरात विक्री करावी लागत आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, राजमाता जिजाऊ चौक, नेहरू चौक, संत ज्ञानेश्वर मंदिर परिसर आणि मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीजवळ फुलांचे स्टॉल सजले आहेत. सणासाठी फुले खरेदी करण्यासाठी ग्राहकांचीही लगबग सुरू आहे. तुलनेने परवडणारे दर असल्याने विक्रेते आणि ग्राहक या दोघांनाही दिलासा मिळत आहे.
....................
((कोट))
अर्ध्या एकरात झेंडूची लागवड केली आहे. मात्र, पावसाअभावी फुले नेहमीप्रमाणे बहरली नाहीत. गेल्या वर्षी या क्षेत्रातील फुलांच्या विक्रीतून जवळपास पावणेदोन लाख रुपये मिळाले होते. यंदा पाणीटंचाईमुळे उत्पन्न कमी मिळण्याची शक्यता आहे.
- गोकुळ देवकते, फुलउत्पादक