आयुर्वेदातील ‘धाराशिव पॅटर्न’ची राष्ट्रीय स्तरावर नोंद
---
२३ संशोधकांच्या योगदानाचा गौरव; हिमोफिलिया संशोधनाला कॉपीराइट
---
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. १४ : हिमोफिलियासारख्या दुर्मिळ रक्तविकारावर आयुर्वेदाच्या माध्यमातून प्रभावी उपाय शोधण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आलेल्या ‘धाराशिव पॅटर्न’ या संशोधन कार्याला भारत सरकारच्या कॉपीराइट कार्यालयाकडून अधिकृत कॉपीराइट प्रमाणपत्र बहाल करण्यात आले आहे. या संशोधनाची राष्ट्रीय पातळीवरील बौद्धिक संपदा नोंदणी झाली आहे.
भारत सरकारच्या कॉपीराइट कार्यालयाने कॉपीराइट अधिनियम, १९५७ अंतर्गत या नावीन्यपूर्ण कार्याची नोंदणी करून अधिकृत प्रमाणपत्र जारी केले आहे. यासाठी दोन मार्च २०२६ ला अर्ज दाखल करण्यात आला होता, ज्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १३ ऑक्टोबर २०२६ ला अधिकृत कॉपीराइट नोंदणीवर शिक्कामोर्तब झाले.
२३ सहकाऱ्यांच्या सामूहिक योगदानाचा गौरव या कॉपीराइट प्रमाणपत्राचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये केवळ एका मुख्य संशोधकाचे नाव नसून, या प्रवासात खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या सर्व २३ सहकाऱ्यांची नावे अधिकृतपणे समाविष्ट करण्यात आली आहेत. संशोधक डॉ. शुभम धूत यांच्या पुढाकारातून या संशोधन कार्याची उभारणी झाली आहे.
-----
((चौकट))
काय आहे ‘धाराशिव पॅटर्न’
हिमोफिलियाग्रस्त रुग्णांच्या खालावलेल्या जीवनमानात सकारात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी आयुर्वेदिक उपचार, वैज्ञानिक मूल्यमापन, कठोर रुग्णसेवा आणि आधुनिक वैद्यकीय पद्धतींचा सुवर्णमध्य साधून धाराशिव पॅटर्न विकसित करण्यात आला आहे. ‘रक्तामृत इन हिमोफिलिया रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल’च्या माध्यमातून हिमोफिलियाच्या व्यवस्थापनासाठी पूरक व पुराव्यांवर आधारित आयुर्वेदिक उपचारपद्धतींचा सखोल अभ्यास केला जात आहे. या संशोधनाला मिळालेली कॉपीराइटची जोड भविष्यात या उपचारांना अधिकृत आणि कायदेशीर मान्यता मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
संशोधक डॉ. शुभम धूत म्हणाले, की शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातून आणि येथील आयुर्वेदिक हिमोफिलिया डे केअर सेंटरमधून सुरू झालेल्या या उपक्रमाचा गाभा असलेली ‘रक्तामृत वटी’ रुग्णांसाठी उपयुक्त ठरत आहे. हिमोफिलिया हा एक जन्मजात, आनुवंशिक आणि गंभीर रक्तस्त्राव विकार असून, यात शरीराची रक्त गोठविण्याची क्षमता कमी होते. सांध्यामध्ये किंवा स्नायूंमध्ये अचानक होणारा रक्तस्राव, किरकोळ दुखापतीनंतरही सतत रक्त वाहणे, शरीरावर निळसर डाग पडणे आणि वेदनादायक सूज येणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत.
या आजारावरील पारंपरिक उपचारांसाठी लागणारे क्लॉटिंग फॅक्टर इंजेक्शन्स अत्यंत महागडे व सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतात. मात्र, या संशोधनातून विकसित करण्यात आलेली ‘रक्तामृत वटी’ हे आयुर्वेदिक औषध रुग्णांसाठी मोठा आशेचा किरण ठरले आहे. या औषधाच्या नियमित सेवनामुळे रुग्णांचे महागड्या क्लॉटिंग फॅक्टरवरील अवलंबित्व प्रभावीपणे कमी झाले असून, सांध्यामधील रक्तस्त्राव आटोक्यात येणे, वेदना कमी होणे आणि रुग्णांच्या जीवनमानात सकारात्मक सुधारणा दिसून आल्या आहेत, असेही डॉ. धूत यांनी सांगितले.