ऐन दिवाळीत भागणार धाराशिवकरांची तहान
------
आजपासून उजनीचे पाणी पूर्ववत सुरू; नऊ ठिकाणची गळती रोखली
----
सकाळ वृत्तसेवा ः
धाराशिव, ता. १ : ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर नागरिकांवर पाणीटंचाईचे मोठे संकट ओढवले असतानाच, नगरपालिकेने घेतलेल्या एका महत्त्वाच्या निर्णयामुळे धाराशिवकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिवाळीचा सण सुरळीत पार पाडण्यासाठी उर्वरित दुरुस्तीचे काम तात्पुरते थांबवून सोमवार (ता. दोन) पासून उजनीवरून पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
उजनी धरणातून धाराशिव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला तब्बल १३ ठिकाणी गळती लागल्यामुळे सात दिवसांपासून या ठिकाणाहून होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद होता. यामुळे शहरात आधीच आठ दिवसांआड होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न अधिकच बिकट बनला होता. जलवाहिनीवरील १३ ठिकाणची गळती रोखण्याचे काम सोमवारी (ता. २६) युद्धपातळीवरील सुरू करण्यात आले होते आणि हे काम ३० ऑक्टोबरपर्यंत चालणार होते. मात्र, काही तांत्रिक बाबींमुळे अद्याप चार ठिकाणची गळती दुरुस्त करणे बाकी आहे. सणाच्या दिवसांत नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागू नये आणि पाण्याचा तुटवडा भासू नये, म्हणून नगरपालिकेने दिवाळीनंतर हे उर्वरित चार ठिकाणचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, उजनीचे पाणी बंद असलेल्या या सात दिवसांच्या काळात प्रशासनाकडून तेरणा प्रकल्पाच्या माध्यमातून शहराला रोटेशननुसार रोज एक तास पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. तरीही ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला पाण्याची मागणी वाढल्याने नागरिकांची धावपळ उडाली होती. आता उद्यापासून उजनीचे पाणी पुन्हा धडकणार असल्याने धाराशिवकरांची तहान भागण्यास मदत होणार आहे.
----
((कोट))
उजनी पाइपलाइनमध्ये १३ ठिकाणी गळती आहे. दुरुस्ती करून ही गळती रोखण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले होते. नऊ ठिकाणची गळती रोखण्यात यश आले आहे. अद्याप चार ठिकाणी गळती सुरूच आहे. मात्र, दिवाळीमुळे हे काम थांबविण्यात आले असून, ते दिवाळीनंतर पुन्हा सुरू करण्यात येईल. धाराशिव शहराला उद्यापासून पूर्वीप्रमाणेच नियमित पाणीपुरवठा करण्यात येईल.
- संग्राम भापकर, अभियंता, पाणीपुरवठा विभाग, नगरपालिका, धाराशिव