फोटो क्रमांक-
OSM26B07398
धाराशिव ः शहरातील वर्दळीच्या प्रमुख रस्त्यालगत्या साइडपट्टीवर आणि डांबरी रस्त्यावर उभी केलेली वाहने.
OSM26B07399
धाराशिव ः मुख्य रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याने रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांना करावी लागत असलेली कसरत.
............
बेशिस्त पार्किंगचा विळखा
धाराशिव ः मुख्य मार्गावरील वाहतुकीचा बोजवारा
धाराशिव, ता. १६ (बातमीदार) : शहरातील नगरपालिका ते बसस्थानक या मुख्य मार्गावर बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या साइडपट्ट्यांसह थेट डांबरी रस्त्यावरच दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शाळकरी मुलांना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत आहे.
शहरातील हा मध्यवर्ती आणि अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. परिसरात जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, जिल्हा न्यायालय आणि नगरपालिका यासारखी महत्त्वाची शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील हजारो नागरिक विविध कामांसाठी दररोज या परिसरात येतात. याशिवाय मार्गावर मोठ्या प्रमाणात व्यावसायिक दुकाने आणि प्रतिष्ठाने आहेत. मात्र, अनेक व्यावसायिकांनी दुकानांसमोर वाहनतळाची पुरेशी व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे ग्राहकांना रस्त्याच्या कडेला किंवा साईडपट्टीवर वाहने उभी करावी लागत आहेत.
साइडपट्ट्यांवर वाहनांचे अतिक्रमण झाल्याने पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र जागाच उरलेली नाही. परिणामी त्यांना थेट वर्दळीच्या डांबरी रस्त्यावरून चालावे लागत आहे. शासकीय कार्यालयांतील नागरिकांची गर्दी आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे अन्य वाहनांचा वेग मंदावतो. त्यामुळे पायी ये-जा करणाऱ्यांची गैरसोय होते. तसेच वाहनचालकांनाही वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, महामार्गालगत डांबरी रस्ता आणि साइडपट्टी यांच्यात उंचीची तफावत अधिक आहे. त्यामुळे वाहनचालक साइडपट्टीवर वाहने घेण्याऐवजी थेट डांबरी रस्त्यावरच वाहने उभी करतात. परिणामी इतर वाहनांना अडथळा निर्माण होतो. ही तफावत दूर करण्यासाठी साइडपट्ट्या भरून समतल करण्याची गरज आहे.
वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाने या मार्गावरील अनधिकृत पार्किंगवर कठोर कारवाई करावी. साइडपट्ट्या समतल करून पादचाऱ्यांसाठी सुरक्षित जागा उपलब्ध करावी, अशी मागणी नागरिक आणि वाहनचालकांकडून होत आहे.