(पान एकवर दुष्काळाच्या बातमीच्या बाजूला)
सव्वादोनशे प्रकल्पांमध्य केवळ
सात टक्के पाणीसाठा शिल्लक!
जिल्ह्यातील ४७ प्रकल्प कोरडे; भूगर्भपातळी थेट ७ मीटरने खाली
धाराशिव, ता. १९ : यंदाच्या पावसाळ्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे धाराशिव जिल्ह्यावर तीव्र पाणीसंकटाचे ढग दाटले आहेत. पावसाळ्याचे दिवस असतानाही जिल्ह्यातील लघू, मध्यम व मोठ्या प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ होण्याऐवजी दिवसेंदिवस मोठी घट होत आहे. जिल्ह्यातील एकूण २२५ प्रकल्पांमध्ये सध्या केवळ ७.३५ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिल्याने आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
यंदाच्या हंगामात सुरवातीपासूनच जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत नगण्य राहिले आहे. प्रकल्पांतील पाणीसाठा किंवा भूगर्भातील पाणीपातळी वाढेल, असा एकही जोरदार पाऊस जिल्ह्यात झाला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ५२.४ टक्के वार्षिक सरासरी पावसाची नोंद झाली आहे. पावसाळा आता अंतिम टप्प्यात आला असून, जलसाठ्यांमध्ये पाणीच न आल्यामुळे प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे.
प्रकल्पांची सद्यःस्थिती :
एकूण प्रकल्प : २२५ (१ मोठा, १७ मध्यम आणि २०७ लघु प्रकल्प)
कोरडे पडलेले प्रकल्प : ४७
जोत्याखालील साठा : १०४ प्रकल्प
२५ टक्क्यांपेक्षा कमी साठा : ६० प्रकल्प
भूगर्भातील पाणीपातळीत मोठी घट
नेहमीच्या काळात पावसाळ्यानंतर भूगर्भातील पाणीपातळी साधारणपणे दोन ते तीन मीटरने खाली जाते. मात्र, यंदा पुरेसा पाऊस न झाल्यामुळे ही पातळी थेट सात मीटरने खाली गेली आहे. भूजलाचा उपसा वाढल्याने आणि फेरभरण (रिचार्ज) न झाल्याने जिल्ह्यातील कूपनलिका व विहिरींनी आधीच तळ गाठला आहे.
प्रशासकीय हालचाली आणि टंचाई आराखडा
वाढत्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर सध्या जिल्ह्यातील सहा गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तसेच, टंचाईग्रस्त भागातील नागरिकांची सोय व्हावी यासाठी प्रशासनाने १८४ विहिरी आणि कूपनलिकांचे अधिग्रहण केले आहे. आगामी काळात टँकर भरण्यासाठीदेखील नवीन जलस्रोतांचा शोध घ्यावा लागण्याची चिन्हे आहेत.
पावसाचा उर्वरित काळ आणि आगामी उन्हाळा डोळ्यांसमोर ठेवून, संभाव्य परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाकडून जुलै २०२७ पर्यंतचा टंचाई आराखडा तयार करण्याचे काम वेगाने हाती घेण्यात आले आहे. पावसाळ्यातील ही बिकट परिस्थिती पाहता, आगामी काळात टँकरची मागणी करणाऱ्या गावांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.