‘शिट्टी’चा खणखणाट अन् फटाक्यांची आतषबाजी
-----
मतमोजणी केंद्राबाहेर धीरज देशमुखांकडून विजयाचा जल्लोष; भाजपचा चार जागांवर विजय
-----
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. १६ : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकार पॅनलने बाजी मारली. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या १५ पैकी ११ जागांवर सहकार पॅनलला दणदणीत विजय मिळाला. सहकार पॅनलने ‘शिट्टी’ या चिन्हावर निवडणूक लढविल्याने मतमोजणी केंद्राबाहेर शिट्यांचा आवाज घुमला. बहुमताने विजयी झाल्याबद्दल पॅनलप्रमुख व माजी आमदार धीरज देशमुख हेही शिटी वाजवत आणि दंड थोपटत या कार्यकर्त्यांच्या आनंदोत्सवात सहभागी झाले, तर दुसरीकडे भाजपने या निवडणुकीत चार चागा जिंकल्या. त्यामुळे भाजपनेही गुलालाची उधळण अन् फटाक्यांची आतषबाजी करीत आनंद व्यक्त केला.
दीड महिन्यापासून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू होती. एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांमुळे, तीन मतदारांचे अपहरण झाल्याच्या तक्रारीमुळे, प्रचारादरम्यान दृश्यम-रामायणसारख्या चित्रपटांचे उल्लेख झाल्याने व महायुतीतील नेत्यांमध्ये फूट पडल्याने ही निवडणूक कायमच चर्चेत राहिली. १९ पैकी चार जागांवर सहकार पॅनलचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित १५ जागांसाठी रविवारी (ता. १५) निवडणूक झाली, तर सोमवारी (ता. १६) मतमोजणी प्रक्रिया झाली. सकाळी नऊपासून मतमोजणीला सुरवात झाली. पण, आठपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपसह महायुतीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गर्दी करायला सुरवात केली. प्रवेशद्वार बंद केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच मोठी गर्दी झाली होती. ध्वनिक्षेपकावरून एकेक निकाल घोषित केला जात होता. दोन तासांच्या अवधीतच पूर्ण निकाल जाहीर झाला. पण, या दोन तासांत दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. निकालाची घोषणा झाल्यानंतर भाजपचे अरविंद पाटील-निलंगेकर, ऋषिकेश कराड हे विजयी उमेदवार मतमोजणी कक्षातून बाहेर आले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्रही त्यांनी यावेळी झळकवले. या निवडणुकीत १९ पैकी १५ जागांवर काँग्रेस विजयी झाली. बहुमताने विजय मिळाल्याने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे लक्ष धीरज देशमुख हे मतमोजणी कक्षातून कधी बाहेर येतात, याकडे लागले होते. काही वेळाने ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आले. त्यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी देशमुख यांनी शिटी वाजवत जल्लोष साजरा केला. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे चुलत बंधू अविनाश जाधव यांनाही देशमुख यांनी आनंदोत्सवात सहभागी करून घेतले. स्वत:च्या गळ्यातून पुष्पहार काढून जाधव यांच्या गळ्यात घातला. दोघांनीही दंड थोपटले. तेव्हा कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली.