धूत ट्रान्समिशन शेंद्रा, बिडकीनमध्ये उभारणार दोन नवे कारखाने
---
२९.९५ एकर जमीन संपादित; ८०० कोटींची गुंतवणूक, ७३० रोजगारांची निर्मिती
--
योगेश पायघन : सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. ६ : वाहन उद्योगाला वायरिंग हार्नेस आणि इलेक्ट्रॉनिक घटकांचा पुरवठा करणाऱ्या धूत ट्रान्समिशन लिमिटेडने शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक क्षेत्रांत दोन नवे कारखाने उभारण्याचे नियोजन केले. या दोन्ही प्रकल्पांसाठी महाराष्ट्र औद्योगिक टाउनशिप लिमिटेडकडून (एमआयटीएल) एकूण २९.९५ एकर जमीन संपादित करण्यात आली. या प्रकल्पांमध्ये ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून, ७३० जणांना रोजगारनिर्मिती होईल.
कंपनीच्या आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या दुसऱ्या तिमाहीच्या आणि पहिल्या सहामाहीच्या गुंतवणूकदार सादरीकरणातही छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन नव्या कारखान्यांसाठी जमीन संपादित केल्याची माहिती सोमवारी शेअर बाजाराला देण्यात आली आहे. बिडकीन औद्योगिक क्षेत्रात कंपनीने २०.०१ एकर जमीन घेतली आहे. येथे १५० कोटी रुपयांची गुंतवणूक करून कारखाना उभारण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पातून ६०० जणांना रोजगार मिळणार आहे. शेंद्रा औद्योगिक क्षेत्रात ९.९४ एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. येथे ६५० कोटी रुपयांचा प्रकल्प प्रस्तावित असून, त्यातून १३० जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या दोन्ही प्रकल्पांच्या उत्पादनाचे स्वरूप, क्षमता आणि प्रत्यक्ष उत्पादन सुरू होण्याचे वेळापत्रक कंपनीने अद्याप जाहीर केलेले नाही.
---
शहरात नऊ उत्पादन केंद्रे
कंपनीच्या सप्टेंबर २०२६ अखेरच्या आकडेवारीनुसार, भारतात २६ आणि भारताबाहेर तीन असे एकूण २९ उत्पादन कारखाने आहेत. त्यापैकी नऊ कारखाने छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. याशिवाय होसूरमध्ये सात, पुण्यात तीन, कांचीपुरम आणि मानेसरमध्ये प्रत्येकी दोन, तर म्हैसूर, झज्जर आणि पिथमपूर येथे प्रत्येकी एक कारखाना आहे. होसूर, झज्जर, पुणे आणि चेन्नई येथेही नवीन वायरिंग हार्नेस प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे.
---
इलेक्ट्रॉनिक्स, ईव्ही क्षेत्रावर लक्ष
धूत ट्रान्समिशनचे छत्रपती संभाजीनगरमध्ये इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या विकासासाठी अभियांत्रिकी व डिझाइन केंद्र कार्यरत आहे. कंपनीच्या देशातील चार अभियांत्रिकी व डिझाइन केंद्रांपैकी हे एक आहे. कंपनी वायरिंग हार्नेसबरोबरच इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी पॅक, बॅटरी व्यवस्थापन प्रणाली, चार्जर, उच्चदाब वायरिंग, सेन्सर, इलेक्ट्रॉनिक नियंत्रक आणि वाहन सुरक्षा प्रणालींच्या उत्पादनांचा विस्तार करीत आहे. दुसऱ्या तिमाहीतील कंपनीच्या एकत्रित महसुलात ईव्ही आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांचा वाटा ३१ टक्के होता.
---
निव्वळ नफ्यात ३३.४ टक्क्यांची वाढ
सप्टेंबर २०२६ अखेरच्या सहामाहीत कंपनीची एकत्रित उलाढाल ३ हजार २७३.६ कोटी रुपयांवर पोचली असून, मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत त्यात ५५.७ टक्क्यांची वाढ झाली आहे. या काळात समायोजित निव्वळ नफ्यात ३३.४ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली. दुसऱ्या तिमाहीतील उलाढाल १,८२७.२ कोटी रुपये आहे. हे आकडे कंपनीच्या एकत्रित व्यवसायाचे आहेत; संभाजीनगरमधील कारखान्यांची स्वतंत्र आर्थिक कामगिरी कंपनीने जाहीर केलेली नाही.
---
दुचाकी, तीनचाकी वायरिंग हार्नेसमध्ये आघाडी
धूत ट्रान्समिशन ही देशातील दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसाठी वायरिंग हार्नेस तयार करणाऱ्या आघाडीच्या दोन कंपन्यांमध्ये समाविष्ट आहे. या बाजारपेठेतील मूल्याच्या आधारावर कंपनीचा वाटा सुमारे ४० टक्के आहे. तर, दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांच्या वायरिंग हार्नेस बाजारपेठेत कंपनीचा वाटा सुमारे ७० टक्के असल्याचे गुंतवणूकदारांसाठीच्या सादरीकरणात नमूद करण्यात आले आहे. दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसह इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील वाढती मागणी लक्षात घेऊन उत्पादन क्षमता विस्तारण्याच्या कंपनीच्या धोरणाचा भाग म्हणून छत्रपती संभाजीनगरमधील शेंद्रा आणि बिडकीन येथील दोन नव्या प्रकल्पांकडे पाहिले जात आहे.