डायल ११२ वर खोटी माहिती देणे भोवले, एकावर गुन्हा
---
लातूर, ता. १८ ः आपत्कालीन मदतीसाठी असलेल्या डायल ११२ सेवेचा गैरवापर करून पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या एका व्यक्तीवर भादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (ता. १५) विकास सदाशिव कांबळे यांनी डायल ११२ क्रमांकावर फोन करून खोटी माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस नियंत्रण कक्षाने तत्काळ पोलिस पथक घटनास्थळी रवाना केले. मात्र, पडताळणी केली असता सदर माहिती पूर्णपणे खोटी असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकारामुळे खऱ्या गरजू व्यक्तीपर्यंत मदत पोचण्यास उशीर होण्याची शक्यता असते. तसेच शासकीय यंत्रणेचा वेळ आणि संसाधनांचा अपव्यय होतो. या प्रकरणी भादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम २१७ नुसार शासकीय अधिकाऱ्याला खोटी माहिती देऊन दिशाभूल करणे हा दंडनीय अपराध आहे.
डायल ११२ ही सेवा केवळ आपत्कालीन परिस्थिती-जसे अपघात, मारहाण, आग, महिलांवरील अत्याचार, नैसर्गिक आपत्ती यासाठीच आहे. या क्रमांकावर खोटी माहिती देऊ नये, मस्करी करू नये किंवा गैरवापर करू नये. खोटी माहिती दिल्यास कलम २१७ नुसार कायदेशीर कारवाई होईल, ज्यात दंड आणि तुरुंगवासाची तरतूद आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.