महिलेला डिजिटल अरेस्ट, १३ लाखांना गंडा
---
बँक खाते दहशतवाद्यांशी जोडलेय म्हणत निवृत्त बॅंकर्सला गंडा
----
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. ५ ः ‘तुमच्या नावाचा गैरवापर करून उघडलेल्या बँक खात्यातून टेरर फंडिंग आणि मनी लाँड्रिंग होत असून, पोलिस बेड्या घेऊन अटकेसाठी येत आहेत’, अशी भीती दाखवून एका ६७ वर्षीय सेवानिवृत्त महिला बँक कर्मचाऱ्याला १३ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सायबर भामट्यांनी महिलेला डिजिटल अरेस्टच्या नावाखाली धमकावून दोन वेगवेगळ्या बँक खात्यांवर ही रक्कम वर्ग करण्यास भाग पाडले. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
सिडको एन-१ भागातील भक्तीनगर येथे राहणाऱ्या शकुंतला नागेश बडवे (वय ६७) या सिंडीकेट बँकेतून वर्ष २०११ मध्ये निवृत्त झाल्या. त्या पेन्शनवर उदरनिर्वाह करतात. त्यांनी त्यांचे घर विकल्यानंतर मिळालेल्या अॅडव्हान्स रकमेपैकी १३ लाख रुपये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यात जमा केले होते. २३ सप्टेंबरला दुपारी ४.२७ च्या सुमारास त्यांच्या मोबाइलवर एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअॅप कॉल आला. समोरील व्यक्तीने आपण ‘डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया’मधून बोलत असल्याचे भासवले. भामट्याने शकुंतला यांना सांगितले, की ‘तुमच्या कागदपत्रांचा गैरवापर करून परस्पर दुसरे बनावट बँक खाते उघडण्यात आले आहे. त्यातून टेरर फंडिंग आणि मनी लाँड्रिंग सुरू आहे. आतापर्यंत दहशतवाद्यांची २६९ बँक खाती जप्त झाली असून, त्यात तुमचेही खाते आढळले आहे. हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेचे आणि मीडियाशी संबंधित आहे. दोन तासांत तक्रार दाखल न केल्यास पोलिस बेड्या घेऊन तुम्हाला अटक करतील. या कारवाईतून बाहेर पडायचे असल्यास रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तपासणी करेल’ असे सांगून भामट्यांनी खात्यातील सर्व रक्कम तात्पुरती हस्तांतरित करण्यास भाग पाडले.
---
दोन टप्प्यांत ट्रान्सफर
सायबर भामट्यांच्या सततच्या धमक्यांमुळे घाबरलेल्या शकुंतला यांनी २९ सप्टेंबरला सिडको टाऊन सेंटर येथील एसबीआय शाखेतून कोटक महिंद्रा बँकेतील ‘टीटीआर इन्फोटेक प्रा. लि.’च्या खात्यावर आरटीजीएसद्वारे आठ लाख रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, ३० सप्टेंबरला येस बँकेतील जीएम सिमेंट अॅण्ड स्टील इंडस्ट्रीजच्या खात्यावर उर्वरित दोन लाख रुपये पाठवले.
--
दर दोन तासांनी फोटो मागवून पाळत
पैसे उकळल्यानंतरही सायबर भामट्यांची मजल थांबली नाही. तुमची तपासणी सुरू असून, आम्हाला वरिष्ठांना अहवाल द्यावा लागतो, त्यामुळे दर दोन तासांनी तुम्ही कोठे आहात याचे फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवा, अशी सक्ती आरोपींनी केली. वारंवार धमक्या देऊन पैशांची मागणी सुरूच राहिल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने सायबर पोर्टलवर तक्रार नोंदवून एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात धाव घेतली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला. तपास पोलिस निरीक्षक गणपत राहिरे करत आहेत.
---
शहरातील दुसरी घटना
शहरात आठवडाभरापूर्वी अशीच घटना घडली होती. ‘तुमच्या नावाने मुंबईत बँक खाते उघडण्यात आले असून, त्यातून दहशतवादी कारवायांसाठी पैसे पाठवले जात आहेत’, अशी भीती दाखवून व्यंकटेशनगर येथील शुभदा अशोक कुलकर्णी (वय ७५) यांना १४ दिवस डिजिटल कैदेत ठेवण्यात आले होते. त्यांच्या पाच खात्यांमधून ३ कोटी ८० हजार रुपये उकळले. या प्रकरणात पोलिसांनी ३२ लाख रुपये गोठवले.
---
ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घ्यावी
ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून ‘डिजिटल अरेस्ट’सह विविध प्रकारच्या सायबर फसवणुका केल्या जातात. त्यामुळे कुटुंबीयांनी ज्येष्ठ नागरिकांना अशा फसवणुकीच्या पद्धतींबाबत माहिती द्यावी. तुमचे खाते बंद होणार आहे, केवायसी अपडेट करा, तुमच्या नावावर गुन्हा दाखल आहे, तुमच्या नावाने पार्सल सापडले आहे, तुम्हाला अटक होणार आहे किंवा पैसे सुरक्षित खात्यात ट्रान्सफर करा, अशा धमकीवजा संदेशांवर विश्वास ठेवू नये, सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच १९३० या राष्ट्रीय सायबर क्राइम हेल्पलाइनवर संपर्क साधावा, तसेच www.cybercrime.gov.in या राष्ट्रीय सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.