शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी डिजिटल ओळख अनिवार्य

शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी डिजिटल ओळख अनिवार्य
Published on: 
पान ४ अँकर ---- फार्मर आयडीशिवाय आता मिळणार नाही शासनाचा एकही कृषी लाभ बीडमध्ये ॲग्रीस्टॅकची युद्धपातळीवर अंमलबजावणी; शेतकऱ्यांना प्रशासनाचे आवाहन सकाळ वृत्तसेवा बीड, ता. १ : केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ आता थेट, पारदर्शक आणि वेगाने शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे. यासाठी बीड जिल्ह्यात कृषी विभागाच्या वतीने ॲग्रीस्टॅक या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत सर्व खातेदार शेतकऱ्यांचा डिजिटल फार्मर आयडी तयार करण्याची मोहीम युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान), पीक विमा आणि कृषी अनुदानाचा अखंडित लाभ मिळवण्यासाठी आता प्रत्येक शेतकऱ्याकडे हा डिजिटल आयडी असणे अनिवार्य करण्यात आले असून, शेतकऱ्यांनी कोणताही विलंब न करता आपली नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. शासकीय योजनांचा लाभ मिळवताना शेतकऱ्यांना वारंवार कागदपत्रे सादर करावी लागतात. या प्रक्रियेत जाणारा वेळ आणि होणारी गैरसोय कायमची टाळण्यासाठी शासनाने डिजिटल ओळखीचा हा आधुनिक पर्याय आणला आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यापुढे पीएम-किसान योजनेचे आगामी हप्ते, महाडीबीटी प्रणालीद्वारे मिळणारे कृषी अवजारे, बी-बियाणे आणि सिंचन साधनांचे अनुदान मिळवण्यासाठी फार्मर आयडी अत्यंत आवश्यक आहे. तसेच, अतिवृष्टी किंवा दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात मिळणारी नुकसान भरपाई, प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि हवामान आधारित फळपीक विमा योजनेचे दावे विनाअडथळा व सुलभतेने मंजूर होण्यासाठी या डिजिटल ओळखीची सक्ती करण्यात आली आहे. भविष्यात शासनाच्या सर्व प्रमुख सुविधांसाठी हाच आयडी ग्राह्य धरला जाणार आहे. शेतकऱ्यांना हा आयडी मिळवणे अत्यंत सोपे व सुलभ करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांना नोंदणी करायची आहे, त्यांनी केवळ आपला डिजिटल सातबारा आणि आधार कार्डशी लिंक असलेला मोबाइल क्रमांक सोबत ठेवणे आवश्यक आहे. या कागदपत्रांच्या आधारे शेतकरी त्यांच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी / महासेवा केंद्र) किंवा ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांशी संपर्क साधून आपली नोंदणी पूर्ण करू शकतात. याशिवाय, ॲग्रीस्टॅक पोर्टल किंवा शासनाच्या अधिकृत मोबाईल ॲपद्वारे घरबसल्या स्वतःहूनही ही नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या डिजिटल पद्धतीमुळे अनुदानाची रक्कम कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास मोठी मदत होणार आहे. ----- कोट केंद्र व राज्य शासनाच्या कृषीविषयक योजनांचा पारदर्शक, जलद आणि थेट लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी बीड जिल्ह्यात ॲग्रीस्टॅक प्रकल्प युद्धपातळीवर राबविला जात आहे. पीएम-किसान योजना, महाडीबीटीच्या अनुदान योजना, नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई तसेच पीक विम्याचा लाभ सुरळीत मिळण्यासाठी डिजिटल फार्मर आयडी अत्यंत अनिवार्य करण्यात आला आहे. वारंवार कागदपत्रे देण्याची कटकट टळून थेट बँक खात्यात पैसे जमा होण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी सातबारा, आधार कार्ड आणि मोबाईलसह जवळच्या सीएससी केंद्राशी संपर्क साधून आपली नोंदणी त्वरित पूर्ण करावी. - सुभाष साळवे, जिल्हा कृषी अधीक्षक, बीड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.