निवृत्तीवेतनधारकांसाठी डिजिटल
जीवन प्रमाणपत्र अभियान सुरू
-----------------------
शुक्रवारी पूर्णा स्थानकावर शिबिर
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. १ ः दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात राष्ट्रव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियान ५.० च्या प्रचार आणि प्रसारासाठी मंडळ रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, रेल विकास सदन, नांदेड येथे कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मंडळ रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले, अन्य रेल्वे अधिकाऱ्यांच्या हस्ते अभियानाच्या बॅनरचे अनावरण करण्यात आले.
हे अभियान एक ते ३० नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. निवृत्तीवेतनधारकांना डिजिटल माध्यमातून घरबसल्या जीवन प्रमाणपत्र तयार करता यावे, त्यासाठी आवश्यक माहिती व सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या अभियानांतर्गत निवृत्तीवेतनधारक आपल्या अँड्रॉइड मोबाइलमधील गुगल प्ले स्टोअरवरून आधार ऑथेंटिकेशन आरडी अॅप आणि जीवन प्रमाण अॅप डाउनलोड करून फेस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून स्वतःचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करू शकतात. अन्य निवृत्तीवेतनधारकांनाही यासाठी मदत करता येणार आहे. याशिवाय नांदेड विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर डिजिटल जीवन प्रमाणपत्र शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानुसार ५ नोव्हेंबर रोजी नांदेड रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक एक येथे, सहा नोव्हेंबरला पूर्णा येथील फलाट क्रमांक १ वरील क्रू कंट्रोल लॉबीत १३ नोव्हेंबरला छत्रपती संभाजीनगर येथील व्हीआयपी लाउंजमध्ये तर २० नोव्हेंबरला आदिलाबाद येथील व्हीआयपी लाउंजमध्ये शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. सर्व शिबिरांना सकाळी १० वाजता सुरवात होणार आहे. रेल्वे प्रशासनाने सर्व निवृत्तीवेतनधारकांना या अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. निर्धारित ठिकाणी आयोजित शिबिरांना उपस्थित राहून डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करून घ्यावे आणि अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जनसंपर्क कार्यालय, नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.