डिजिटल युगातील वाचन संस्कृतीवर कार्यशाळा
पाटोदा ः जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी झाली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी डिजिटल युगातील वाचन संस्कृती यावर कार्यशाळा घेण्यात आली. प्राचार्य डॉ. विश्वास कदम, डॉ. सुनील जाधव, डॉ. भगवान डाके, प्रा. केशव सुर्वे, डॉ. सदाशिव सरकटे, प्रा. विनोद किर्दक यांनी प्रतिमापूजन केले. डॉ. भगवान डाके यांनी ई-पुस्तके व ऑनलाइन ग्रंथालयांची माहिती देत वाचनाची सवय वाढवण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय समारोपात प्रा. केशव सुर्वे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ. बंडू लोखंडे यांनी केले, तर राऊत कल्याणी जितेंद्र हिने आभार मानले.
------
उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी
माजलगाव ः तालुक्यात दुष्काळी स्थिती असून, रब्बी पिकांना संजीवनी देण्यासाठी जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडावे, अशी मागणी सभापती जयदत्त नरवडे यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. पावसाअभावी शेतकरी अडचणीत असून रब्बी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. उजव्या कालव्यातून पाणी सोडल्यास ज्वारी, गहू, हरभऱ्याला आधार मिळेल आणि जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. त्यामुळे विभागाने तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी नरवडे यांनी केली. यावेळी आमदार प्रकाश सोळंके, डॉ. वसीम मनसबदार, संभाजी शेजुळ आदी उपस्थित होते.
-------
साने गुरुजी विद्यालयाचे हॉकी स्पर्धेत यश
केज ः जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा हॉकी असोसिएशनतर्फे आयोजित जिल्हास्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत केजच्या साने गुरुजी निवासी विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. १७ वर्षे वयोगटातील अंतिम सामन्यात श्रीकृष्ण विद्यालयावर मात करत या संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. संघास प्रशिक्षक साक्षी कराड व दत्तात्रय घुले यांचे मार्गदर्शन लाभले. यशाबद्दल बीड जिल्हा ऊसतोड विकास मंडळाचे अध्यक्ष ॲड. उद्धव कराड, उपाध्यक्ष राजेश कापसे, विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कविता गिते-कराड व शिक्षकांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
-------
पास सवलत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय
केज ः कळंब आगाराने केज-कळंब मार्गावर सुरू केलेल्या वातानुकूलित ई-बसमध्ये पास सवलत नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. नियमित प्रवासात आर्थिक भुर्दंड पडत असून अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांवर शिक्षण थांबवण्याची वेळ आली आहे. या समस्येवर साळेगावचे सरपंच कैलास पाटील यांनी आगार प्रमुख घोलप यांची भेट घेऊन, ई-बसमध्ये पास सवलत द्यावी किंवा साधी बस सेवा वाढवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. यावेळी गौतम बचुटे व सुधाकर इंगळे उपस्थित होते. आगार प्रमुखांनी विद्यार्थ्यांची अडचण समजून घेत वरिष्ठांशी पत्रव्यवहार करून साधी बस वाढवण्याचे आश्वासन दिले.
------
धर्मराज करपे लिखित ५ पुस्तकांचे प्रकाशन
गेवराई ः डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा (उमापूर) येथे उपक्रमशील शिक्षक धर्मराज करपे यांनी लिहिलेल्या ५ पुस्तकांचा प्रकाशन सोहळा पार पडला. संताजी जगनाडे महाराज, राष्ट्रसंत गाडगे महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मोबाइलकडून पुस्तकांकडे आणि शाळेतील संग्रहालयाचे महत्त्व या पुस्तकांचे प्रकाशन सहकारी शिक्षकांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांनी महापुरुषांची प्रेरणा घ्यावी यासाठी हे लेखन केल्याचे करपे यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मनोजकुमार ठाकूर होते. प्रमुख अतिथी कवी पंढरीनाथ वैद्य होते. प्रास्ताविक अनिता गात, सूत्रसंचालन भगवान घुंदे आणि आभार गंगाराम शिंदे यांनी मानले.
------
परळीत शेतकरी मदत केंद्राचा शुभारंभ
परळी ः शेतकऱ्यांना पीकविमा व शासकीय योजनांवर मार्गदर्शन करण्यासाठी परळीच्या भवानीनगरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शेतकरी मदत केंद्र सुरू झाले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, प्रा. सुषमा अंधारे, अशोक सकपाळ व रत्नाकर शिंदे यांच्या सूचनेनुसार हे केंद्र उभारले. उद्घाटनास उपजिल्हाप्रमुख नारायण सातपुते, भोजराज पालीवाल, जगन्नाथ साळुंखे, महेश केंद्रे, प्रकाश साळुंखे, विजय जाधव, हरीश पालीवाल, विशाल सुग्रीव, बालाजी नागरगोजे, नाथराव गुट्टे, बाळासाहेब होळंबे, बाळासाहेब साठे उपस्थित होते.
------
धारूर-पुणे एसटी बस सेवा अखेर पूर्ववत
केज ः बंद केलेली धारूर-पुणे (दुपारी १ वा.) एसटी बस सेवा प्रवाशांच्या मागणीनंतर पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. बस बंद असल्याने बार्शी, हडपसरकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत होती. बहुजन अधिकार आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष राम शेंडगे यांनी ७ ऑक्टोबरला आगार प्रमुखांकडे ही बस पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. याची दखल घेत धारूरचे आगार प्रमुख सं. ना. महाजन यांनी १२ ऑक्टोबरपासून बस सेवा पूर्ववत केली. तसेच, दिवाळीच्या गर्दीमुळे २८ ऑक्टोबरपासून रात्री ९ वाजताही धारूर-पुणे बस सुरू करण्याचे नियोजन त्यांनी कळवले आहे.
-------
परळी आयटीआयच्या सात विद्यार्थ्यांची निवड
परळी ः हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक येथे शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षणासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परळी वैजनाथ येथील ७ प्रशिक्षणार्थ्यांची निवड झाली आहे. १५ ऑक्टोबरच्या प्रथम निवड यादीत फिटर व्यवसायातून प्रणव प्रमोदकुमार दुबे, प्रथमेश हरिराम कराड, लहू संतोष धुर्वे, आदित्य तात्याराव रोडे, संदेश दत्ता घाडगे, राजकुमार भीमराव सिरसाट आणि पत्रेकारागीर व्यवसायातून उमाकांत बाळासाहेब माचवे यांचा समावेश आहे. फिटर उमेदवारांना २६ ऑक्टोबर तर पत्रेकारागीर उमेदवाराला ३० ऑक्टोबर रोजी रुजू होण्याचे निर्देश दिले आहेत.
-------
रोकडेश्वर मंदिर परिसरात वृक्षारोपण
बीड ः पर्यावरण संवर्धन आणि मंदिर परिसराचे नैसर्गिक सौंदर्य वाढवण्यासाठी धर्मापुरी येथील श्री जागृत रोकडेश्वर देवस्थान समितीतर्फे मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सावली मिळावी, परिसरात हिरवाई निर्माण व्हावी आणि पर्यावरणाचा समतोल राखला जावा, हा यामागील मुख्य उद्देश आहे. केवळ वृक्षारोपण न करता रोपांना पाणी घालून त्यांच्या संगोपनाची काळजीही समितीकडून घेतली जात आहे. वाढते तापमान आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम महत्त्वपूर्ण असून, भविष्यात हे वृक्ष भाविकांना सावली देतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
------
स्वा. सावरकर विद्यालयात विद्यार्थ्यांचे प्रबोधन
बीड ः बीडच्या स्वा. सावरकर माध्यमिक विद्यालयात किशोरवयीन मुलामुलींच्या भावभावनांचे नियमन यावर स्वतंत्र सत्रांत प्रबोधनात्मक कार्यशाळा पार पडली. यात किशोरवयातील बदल, ताणतणाव नियंत्रण व पालकांशी संवाद यावर मार्गदर्शन झाले. शिक्षिका दीपा परोपकारी, नीता केंद्रे, अनुपमा पाटील, दीपा लोहिया, दीपा देशपांडे, चेतन धुरंधरे, चंद्रकांत घोलप आणि माधवी डोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पहिल्या सत्राचा समारोप सुजाता चिंचपूरकर तर दुसऱ्या सत्राचा समारोप समिती अध्यक्ष प्रमोदराव कुलकर्णी यांनी केला. मुख्याध्यापक प्रा. चंद्रकांत मुळे व उमेश जगताप यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन मुकुंद मिरगे यांनी केले.
------
परमेश्वर महाराज गवळींची सुश्राव्य कीर्तनसेवा
माजलगाव ः माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथे श्री महालक्ष्मी देवीच्या नवरात्र महोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात परमेश्वर महाराज गवळी यांची सुश्राव्य कीर्तनसेवा पार पडली. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम या अभंगावर निरूपण करताना त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या नाममहिम्याचे महत्त्व विशद केले. तुकोबारायांच्या भक्तीची ताकद सांगताना त्यांनी रामेश्वर भट्टांचा ऐतिहासिक संदर्भ दिला. कलियुगात भगवंताचे नामस्मरण हेच शांतीचे साधन असल्याचे त्यांनी सांगितले. सप्ताहात रोज काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन होत असून भाविकांच्या प्रचंड उपस्थितीमुळे परिसर भक्तिमय झाला आहे.