डिप्लोमाच्या नव्या विद्यार्थ्यांसाठी
परीक्षा अर्जाचे स्वतंत्र वेळापत्रक
----
छत्रपती संभाजीनगर, ता. ३ : तंत्रशिक्षण संचालनालयाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील पदविका अभ्यासक्रमांच्या संस्थास्तरीय तसेच सर्व प्रकारच्या प्रवेशांची अंतिम मुदत १४ सप्टेंबरपर्यंत वाढविल्याने महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोंदणी आणि हिवाळी २०२६ परीक्षेच्या अर्जाचे स्वतंत्र वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. १४ सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या नव्या वेळापत्रकानुसार प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
मंडळाने स्पष्ट केले की, प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्षातील १४ ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित झालेल्या पात्र विद्यार्थ्यांची नोंदणी तसेच हिवाळी २०२६ परीक्षेचे अर्ज पूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसारच भरावे लागतील. नियमित शुल्कासह विहित मुदतीत प्रक्रिया पूर्ण न केलेल्या विद्यार्थ्यांना विलंब शुल्क आणि अतिविलंब शुल्कासह अर्ज भरावा लागेल. या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
-
१५ ऑगस्टनंतर प्रवेश घेणाऱ्यांना स्वतंत्र प्रक्रिया
तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रवेशाची अंतिम मुदत १४ सप्टेंबरपर्यंत वाढविल्यामुळे या कालावधीत नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंडळ स्वतंत्र वेळापत्रक प्रसिद्ध करणार आहे. त्यानुसार नियमित परीक्षा शुल्कासह नोंदणी, पुन्हा नोंदणी आणि हिवाळी २०२६ परीक्षेचे अर्ज भरता येणार आहेत. तसेच संस्था बदल अथवा अभ्यासक्रम बदल झालेल्या विद्यार्थ्यांनाही या प्रक्रियेत समाविष्ट करण्यात येणार आहे.