जिद्दीतून जन्मले व्यावसायिक ‘यूज अँड थ्रो रेझर’ 

जिद्दीतून जन्मले व्यावसायिक ‘यूज अँड थ्रो रेझर’ 

औरंगाबाद: कल्पनाशक्ती, जिद्द, मेहनत, चिकाटी, संशोधनवृत्ती बाळगून सामान्य माणूसही असामान्य कामगिरी बजावू शकतो, हे सिद्ध केले आहे पैठण (जि. औरंगाबाद) येथील विलास लक्ष्मण मोरे (वय ५५) यांनी. जिद्दीने सहा वर्षे संशोधन करून त्यांनी सलूनमध्ये दाढीसाठी लागणारे व्यावसायिक ‘यूज अँड थ्रो रेझर’ (डिस्पोजेबल शेव्हिंग रेझर) तयार केले आहे. त्यांच्या या संशोधनाला पेटंट मिळाले आहे. केंद्राच्या पेट्रोकेमिकल्स अँड फर्टिलायझर मंत्रालयाकडून त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

पेटंट मिळाल्यानंतर मोरे यांनी रेझरचे व्यावसायिक उत्पादन सुरू केले आहे. दिवसाकाठी ते अडीचशे रेझरची निर्मिती करू शकत आहेत. आरोग्य, स्वच्छतेच्या दृष्टीने ते सुरक्षित आहे. त्यामुळे कोरोनाकाळात सलूनचालकांकडून तब्बल बारा हजार रेझरची मागणी आली. मोठ्या मागणीच्या पूर्ततेसाठी आधुनिक यंत्राच्या माध्यमातून ते रेझर तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

पैठणमधून सलून व्यवसायाची सुरवात 

पैठणमधील नाथ हायस्कूलमध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यावर विलास मोरे यांनी १९७६ मध्ये सलून व्यवसायाला सुरवात केली. त्यावेळी विज्ञान, संशोधनाशी कुठलाही संबंध नव्हता. तरीही नवनवीन गोष्टींचे निरीक्षण, अनुभवातून शिकण्याची त्यांना आवड आहे. २००९ पर्यंत ते पारंपरिक वस्तऱ्याने दाढी करीत. वस्तऱ्यात मळ साचण्यासह काही समस्या त्यांना दिसल्या. विशिष्ट लिक्विडने वस्तरा स्वच्छ करणे हा तात्पुरता पण वारंवार करावा लागणारा प्रकार. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा विचार त्यांच्या मनात होता. त्यातून रेझरच्या संशोधनाची सुरवात झाली.

संकल्पनेला दिले मूर्त स्वरुप 

पारंपरिक वस्तऱ्यात ब्लेड घुसवून दाढी करताना जखम होणे, वस्तऱ्यात मळ साचणे, त्यातून दुर्गंधी येणे आदी समस्या निर्माण होतात, हे कळल्यानंतर वैयक्‍तिक वापरासाठी असलेल्या रेझरप्रमाणेच व्यावसायिक ‘यूज अँड थ्रो रेझर’ (डिस्पोजेबल शेव्हींग रेझर) ची संकल्पना जन्माला आली. आधी कागदावर उतरवलेल्या संकल्पनेला मोरे यांनी मूर्त स्वरुप दिले आणि रेझर तयार करून सलुनमध्ये ट्रायलही घेतली. लगेचच व्यावसायिक वापर सुरु केला. 

सहा ते दहा ग्रॅमचे रेझर 

व्यावसायिक वापराच्या युज ॲण्ड थ्रो रेझरचे वजन सहा ते दहा ग्रॅम आहे. हॅंडल, रेझर असे दोन मुख्य भाग. हॅंडल कायमस्वरूपी आहे, तर वापप झाल्यावर रेझर बदलावे लागते. रेझर आणि हॅडलला जोडणारे विशिष्ट लॉक असून रेझर वापरल्यानंतर ते आपोआप तुटते. त्यामुळे रेझर पुन्हा वापरता येत नाही. यामुळे संसर्गजन्य आजारांच्या संक्रमणापासून बचाव करण्यासाठी मदत होते. मोरे यांनी काही अन्य सलुनमध्येही या प्रयोगाचे प्रात्यक्षिक करून पाहिले. बारकावे लक्षात घेऊन त्रुटी दुर केल्या. पुढे ‘सीएमआय' मधील उद्योजकांच्या मार्गददर्शनातून परिपुर्ण रेझर तयार झाले. 

संशोधनानंतर मिळाले पेटंट 

रेझर तयार केल्यानंतर मोरेंनी पेटंटसाठी अर्ज केला. ते मिळविण्यासाठी कष्ट घ्यावे लागले. एवढ्यावर न थांबता त्यांनी सिपेट येथून अभ्यासक्रमही पुर्ण केला. उत्पादन प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अखेर त्यांना डिस्पोजेबल शेव्हींग रेझर चे पेटंट मिळाले. 

व्यावसायिक उत्पादन सुरु 

पेटंट मिळाल्यानंतर रेझरचे व्यावसायिक उत्पादन सुरु करण्याचे मोरेंसमोर आव्हान होते.'सीएमआय'च्या मदतीने त्यांनी हॅण्ड मोल्डींग मशीन तयार केले. त्यावर ते २ मिनीटाला १ रेझर पीस, दिवसरात २४० नग तयार होतात. सध्या रेझरची किंमत तीन रुपये तर वस्तरा ५० रुपयांपर्यंत आहे. आतापर्यंत अनेक वस्तरे, रेझर त्यांनी तयार केले. 

कोरोनात मोठी मागणी 

आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त व्यावसायिक युज ॲण्ड थ्रो रेझर तयार केल्यामुळे कोरोना काळात त्याला मोठी मागणी आहे. सध्या त्यांच्याकडे सुमारे बारा हजार रेझरची मागणी आहे. एवढे उत्पादन ते करु शकत नाही. त्यासाठी ते आधुनिक यंत्र घेण्याच्या विचारात आहेत. 

सलुन व्यवसायातील हे अनोखे उत्पादन आहे. हे उत्पादन आरोग्यासाठी उपयुक्त, अतिशय हलके, वापरासाठी सुकर आणि अल्प दरात आहे. सहा वर्षे संशोधन करुन हे रेझर तयार केले आहे. या संशोधनासाठी केंद्राचा पुरस्कारही मिळाला आहे. आता याचे उत्पादन कसे वाढविता येईल, याकडे शासनाने लक्ष द्यायला हवे. मला आर्थिक लाभापेक्षा लोकांच्या आरोग्य महत्वाचे आहे. 
- विलास मोरे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com