जिल्हाध्यक्षाची खुर्ची अन् आमदारकीची संधी..! मराठवाड्यातले भाजपचे पाच जिल्हाध्यक्ष आमदार; भाजपचा ‘पॅटर्न’ चर्चेत

जिल्हाध्यक्षाची खुर्ची अन् आमदारकीची संधी..! मराठवाड्यातले भाजपचे पाच जिल्हाध्यक्ष आमदार; भाजपचा ‘पॅटर्न’ चर्चेत
Published on
जिल्हाध्यक्षाची खुर्ची अन् आमदारकीची संधी..! मराठवाड्यातले भाजपचे पाच जिल्हाध्यक्ष आमदार; भाजपचा ‘पॅटर्न’ चर्चेत नवनाथ इधाटे फुलंब्री, ता.१८ : भाजपमध्ये जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी म्हणजे केवळ पक्ष संघटनेची धुरा नव्हे, तर तळागाळातील कार्यकर्त्यांपासून निवडणुकीच्या राजकारणापर्यंत नेतृत्व सिद्ध करण्याची संधी मानली जाते. मराठवाड्यातील राजकारणात जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी चांगल्या पद्धतीने सांभाळल्यानंतर विधानसभा अथवा विधान परिषदेत पोहोचलेल्या नेत्यांची मालिका पाहता आता या पदाकडे राजकीय ‘लॉन्चिंग पॅड’ म्हणूनही पाहिले जात आहे. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी सुरेश बनकर यांची झालेली निवड राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. मराठवाड्यात आतापर्यंत भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर आमदारकीपर्यंत पोहोचलेल्या सहा नेत्यांचा उल्लेख केला जातो. यामध्ये अतुल सावे, आर. टी. देशमुख, राम पाटील रातोळीकर, रमेश कराड आणि सुहास शिरसाठ यांचा समावेश आहे. यापैकी काहींनी विधानसभा, तर काहींनी विधान परिषदेत प्रवेश केला. त्यामुळे जिल्हाध्यक्षपद आणि त्यानंतर मिळालेली लोकप्रतिनिधित्वाची संधी यामध्ये राजकीय संबंध जोडला जात असल्याचे चित्र आहे. .... • मंत्री सावेपासून ते विधान परिषदेचे आमदार शिरसाठापर्यंत • छत्रपती संभाजीनगरचे अतुल सावे यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून संघटनात्मक जबाबदारी सांभाळल्यानंतर २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत प्रवेश केला. बीडचे आर. टी. देशमुख यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून काम केल्यानंतर २०१४ मध्ये माजलगाव मतदारसंघातून विधानसभा गाठली. नांदेडचे राम पाटील रातोळीकर यांनी दीर्घकाळ जिल्हाध्यक्ष म्हणून संघटनात्मक जबाबदारी सांभाळल्यानंतर विधान परिषदेत प्रवेश केला. लातूरचे रमेश कराड यांच्याकडे १३ फेब्रुवारी २०२० रोजी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आली आणि त्यानंतर काही महिन्यांतच त्यांना विधान परिषदेची संधी मिळाली. या पॅटर्न मधील अलीकडचे नाव म्हणजे सुहास शिरसाठ. 2024 चे विधानसभेत इच्छुक असतानाही उमेदवारी मिळाली नाही मात्र त्यानंतर पक्षाचे संघटन करण्याचे काम केले. याचीच पक्षाने दखल घेऊन त्यांना २८ मे २०२६ मध्ये थेट विधान परिषदेची उमेदवारी देऊन त्यांना आमदार बनवले. मागील गेल्या साडेचार वर्षांपासून सुहास शिरसाठ यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर पूर्वची जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. त्यामुळे आता जिल्हाध्यक्ष पदाची संधी सुरेश बनकर यांना मिळाली. परंतु त्यांचं संघटन कौशल्य आणि कामगिरी यावरच त्यांचं पुढचं आमदारकीच भवितव्य अवलंबून राहणार असल्याची चर्चा आहे. .... • आता बनकरांकडे राजकीय लक्ष • सुहास शिरसाठ आमदार झाल्यानंतर आता भाजपने छत्रपती संभाजीनगर पूर्वची जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सुरेश बनकर यांच्याकडे सोपविली आहे. विशेषतः सिल्लोड विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर बनकरांची जिल्हाध्यक्षपदी झालेली निवड महत्त्वाची मानली जात आहे. सिल्लोडमध्ये भाजपची संघटनात्मक ताकद वाढविणे, कार्यकर्त्यांना एकत्र ठेवणे, आगामी राजकीय समीकरणांमध्ये पक्षाची भूमिका मजबूत करणे आणि स्थानिक पातळीवर संघटन उभे करणे, अशी अनेक आव्हाने बनकरांसमोर असणार आहेत. .... • ‘जिल्हाध्यक्ष ते आमदार’ पॅटर्नची चर्चा का0• भाजपमध्ये जिल्हाध्यक्षपद हे पक्ष संघटनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. जिल्ह्यातील मंडळे, बूथरचना, कार्यकर्त्यांचे नेटवर्क, निवडणूक व्यवस्थापन आणि पक्षाची राजकीय भूमिका तळागाळापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी जिल्हाध्यक्षावर असते. त्यामुळे या पदावर काम करणाऱ्या नेत्याची संघटनात्मक क्षमता पक्षश्रेष्ठींना जवळून पाहता येते. याच कारणामुळे जिल्हाध्यक्षपद सांभाळल्यानंतर आमदारकीपर्यंत पोहोचलेल्या नेत्यांची उदाहरणे आता राजकीय चर्चेत आणली जात आहेत. ..... • जिल्हाध्यक्ष झाले अन् आमदारकी गाठली!• • अतुल सावे — छत्रपती संभाजीनगर २००६–२००९ जिल्हाध्यक्ष → २०१४ विधानसभा आमदार • आर. टी. देशमुख — बीड सुमारे सहा वर्षे जिल्हाध्यक्ष → २०१४ माजलगाव विधानसभा आमदार • राम पाटील रातोळीकर — नांदेड दीर्घकाळ जिल्हाध्यक्ष → विधान परिषद आमदार • रमेश कराड — लातूर १३ फेब्रुवारी २०२० जिल्हाध्यक्ष → १४ मे २०२० विधान परिषद आमदार • सुहास शिरसाठ — छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष → २०२६ विधान परिषद आमदार .....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com