ABD26J82702
हिंगोली : बावनखोली भागातील जि.प. शाळेतील विद्यार्थ्याशी संवाद साधताना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता.
-----------
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला विद्यार्थ्यांचा क्लास
--
बावनखोली परिसरातील शाळा पाहणीदरम्यान साधला संवाद
-
हिंगोली, ता. ४ : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शहरातील बावनखोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला बुधवारी (ता. चार) सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी थेट वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. इंग्रजी व्याकरणातील टेन्स या विषयावर विद्यार्थ्यांचा क्लास घेतला. तसेच शाळेतील शैक्षणिक कामकाज, अध्यापन पद्धती आणि विविध सुविधांचा आढावा घेतला.
बावनखोली येथील जि.प. शाळेत आगमनानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. इंग्रजी व्याकरणातील वर्तमानकाळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ या टेन्सच्या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तरांवरून त्यांच्या विषयाच्या आकलनाची पडताळणी केली. इंग्रजी भाषेतील मूलभूत संकल्पना स्पष्ट असणे आवश्यक असल्याचे अधोरेखित करत त्यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचा नियमित सराव करण्याचे महत्त्व सांगितले.
अध्यापन पद्धतींचा घेतला आढावा
विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या अध्यापन पद्धतींची माहिती घेतली. इंग्रजी व्याकरणातील संकल्पना विद्यार्थ्यांना सहज समजावून सांगण्यासाठी कोणत्या पद्धतींचा आणि शैक्षणिक साहित्याचा वापर केला जातो, याची विचारणा केली. विद्यार्थ्यांचे आकलन वाढविण्यासाठी शिक्षकांनी अधिक प्रभावी आणि कृतीशील अध्यापन पद्धतींचा अवलंब करण्यावर भर दिला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती, भौतिक सुविधा आणि विविध शैक्षणिक उपक्रमांची पाहणी करण्यात आली. शाळेतील शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि अध्यापनाच्या गुणवत्तेचा आढावा घेत आवश्यक सूचना देण्यात आल्या.
---------
गुणवत्तावाढीसाठी प्रत्यक्ष पाहणी
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती केवळ अहवालातून न घेता प्रत्यक्ष वर्गात जाऊन त्यांच्या आकलनाची पडताळणी करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकाऱ्यांची ही भेट महत्त्वपूर्ण ठरली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षक आणि शाळा प्रशासनाने सातत्याने प्रयत्न करावेत, यावर त्यांनी भर दिला.