जिल्हा परिषदेच्या १८४ कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी
परभणी, ता. ८ : जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजीत आरोग्य तपासणी शिबीरात १८४ अधिकारी, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची दैनंदिन धावपळ, कामाचा वाढता ताण तसेच बदलती जीवनशैली यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना वेळोवेळी आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांच्या संकल्पनेतून या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ३२७ पैकी १८४ अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरात वजन, उंची, रक्तदाब, रक्तातील साखर, रक्त तपासणी तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात आली.
वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून आवश्यकतेनुसार संबंधितांना आरोग्यविषयक मार्गदर्शन व सल्ला देण्यात आला. हे शिबिर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोन्सीकर आणि जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आर. एम. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.
-----
प्रत्येकाने नियमित आरोग्य तपासणी, योग्य आहार, व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करून आपले आरोग्य सुदृढ ठेवावे.
-नतिशा माथूर, मुख्य कार्यकारी अधिकारी