नेटबॉलच्या जिल्हा संघासाठी बुधवारी निवड चाचणी
----
कळंब, ता. १ (बातमीदार) : बारामती येथे १२ ते १४ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय ज्युनिअर नेटबॉल स्पर्धेसाठी धाराशिव जिल्ह्याचा संघ निवडण्यात येणार आहे. यासाठी बुधवारी (ता. चार) कळंब येथील तालुका क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय अजिंक्यपद स्पर्धा व निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. यातून ज्युनिअर गटातील मुले व मुलींचा जिल्हा संघ निवडला जाणार आहे.
अमॅच्युअर नेटबॉल स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने आणि पुणे जिल्हा नेटबॉल असोसिएशनच्या सहकार्याने बारामती येथे राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याचा संघ सहभागी होणार असल्याने जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना राज्य स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. निवड चाचणी बुधवारी सकाळी दहाला तालुका क्रीडा संकुल, कळंब येथे सुरू होईल. सहभागी खेळाडूंच्या कामगिरीआधारे जिल्ह्याचा संघ निवडण्यात येणार असून, निवडप्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी संघटनेच्या वतीने अधिकृत निवड समिती गठित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पात्र व इच्छुक खेळाडूंनी आवश्यक क्रीडा साहित्य व सामग्रीसह वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन धाराशिव जिल्हा नेटबॉल संघटनेचे जिल्हाध्यक्ष उत्तरेश्वर गायकवाड, सल्लागार प्रा.डॉ. मीनाक्षी शिंदे-भवर, उपाध्यक्ष संजय घुले, सचिव शरद गव्हार व बालाजी पवार यांनी केले.