लोगो : आली दिवाळी
-
लातूर : दिवाळीच्या निमित्ताने उटणे तयार करण्यात रमलेली स्वाधार केंद्रातील तरुणाई.
--
कष्टातून दरवळतोय उटण्याचा सुगंध
स्वाधार केंद्रातील तरुणाईचा उपक्रम; बारा हजार पाकिटे घरोघरी पोचवण्याचे उद्दिष्ट
---
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. २९ : गुलाबाच्या पाकळ्या, तुळस, संत्र्याची साल, नागरमोथा, हळद, कपूर कचरी, चंदन, आंबेहळद आणि वाळा अशा नैसर्गिक घटकांपासून उटणे तयार करण्यात ‘ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान’च्या स्वाधार केंद्रातील दिव्यांग बांधव रमले आहेत. उटणे तयार झाल्यानंतर त्याची आकर्षक पॅकिंग करून ते बाजारात विक्रीसाठी आणले जात आहेत. या उपक्रमातून दिव्यांगांच्या कौशल्याला बाजारपेठ मिळण्यासोबतच रोजगार आणि आर्थिक आधारही मिळत आहे.
दिवाळीच्या अभ्यंग स्नानासाठी बुधोडा येथील ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान संचालित स्वाधार केंद्रातील दिव्यांग बांधव नैसर्गिक वनौषधींपासून आयुर्वेदिक उटणे तयार करीत आहेत. केंद्राने यंदा बारा हजार उटणे पाकिटे तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, आतापर्यंत प्रत्येकी ५० ग्रॅम वजनाची सात हजार पाकिटे तयार केली आहेत. तयार केलेले आयुर्वेदिक उटणे उच्च गुणवत्तेसाठी ओळखले जाते. मागील वर्षी लातूरमधील विविध शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांसह विविध ठिकाणी स्टॉल लावून दिव्यांगांनी पाच हजार उटणे पाकिटांची विक्री केली होती. यंदाही उटणे विक्रीच्या माध्यमातून दिव्यांगांना रोजगार आणि त्यांच्या श्रमाला योग्य मोबदला मिळवून देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.
दुष्काळामुळे संस्थेला पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, उटणे विक्रीतून उभा राहणारा निधी पाणीपुरवठ्याच्या व्यवस्थेसाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी उटणे खरेदी करून दिव्यांगांच्या श्रमाला प्रोत्साहन द्यावे आणि संस्थेच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी हातभार लावावा, असे आवाहन संस्थेने केले आहे. प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त प्रशांत सुडे म्हणाले, स्वाधार केंद्र गेल्या चार दशकांपासून ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांच्या पुनर्वसनाचे कार्य करत आहे. आपल्या समृद्ध संस्कृतीचा वारसा जतन करण्यासाठी दिव्यांग बांधव शुद्ध आयुर्वेदिक उटणे तयार करत आहेत. यातून दिव्यांगांना रोजगार आणि स्वाधारच्या कार्याला आर्थिक पाठबळ मिळणार आहे, असे त्यांनी नमूद केले.
---