आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या
Published on: 
शेतकरी कुटुंबांसोबत ‘सेवासदन’ची दिवाळी १०० कुटुंबांना करणार किराणा किट, साडीचोळीचे वाटप; शुक्रवारी स्नेहसोहळा ----- हिंगोली, ता. २ (बातमीदार) : दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना दिवाळीचा आनंद मिळावा, यासाठी सेवासदन परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत यंदाची दिवाळी आत्महत्याग्रस्त शेतकरी, निराधार आणि दिव्यांग कुटुंबांसोबत साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमातून १०० कुटुंबांच्या जीवनात आनंदाचा आणि प्रकाशाचा दिवा लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दिवाळीचा सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला असून बाजारपेठेत खरेदीची लगबग सुरू आहे. मात्र, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांपुढे घरातील कर्ता व्यक्ती गमावल्याने अनेक संकटे उभी आहेत. अशा कुटुंबांनाही दिवाळी साजरी करता यावी, यासाठी सेवासदनच्या मीरा कदम आणि धनराज कदम यांनी पुढाकार घेतला आहे. सहा नोव्हेंबरला कै. शिवाजीराव देशमुख सभागृहात सकाळी अकराला दिवाळी स्नेहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी १०० कुटुंबांना किराणा किट आणि साडीचोळीचे वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, प्रभारी पोलिस निरीक्षक कमलेश मीना, उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. निवडलेल्या कुटुंबांना किराणा किट आणि साडीचोळी सन्मानपूर्वक भेट देण्यात येणार आहे. केवळ आर्थिक मदत करणे नव्हे, तर संकटाच्या काळात समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे, ही भावना या कुटुंबांमध्ये निर्माण करणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ----- अभिनेत्री पुष्पा चौधरींचा सहभाग सेवासदन परिवाराच्या या उपक्रमाची माहिती मिळताच ज्येष्ठ अभिनेत्री पुष्पा चौधरी यांनी कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा धनराज कदम यांच्याकडे व्यक्त केली. शेतकरी कुटुंबांच्या कठीण काळात आपण त्यांच्यासोबत असून, आपल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ----- दानशूरांना सहभागाचे आवाहन सामाजिक उपक्रमात अधिकाधिक दानशूर व्यक्तींनी सहभागी होऊन संकटग्रस्त कुटुंबांच्या दिवाळीत आनंद निर्माण करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन सेवासदनच्या मीरा कदम आणि धनराज कदम यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.