आजपासून सर्वत्र उत्साहात रंगणार ''दीपोत्सव''

आजपासून सर्वत्र उत्साहात  रंगणार ''दीपोत्सव''
Published on: 
आजपासून रंगणार दीपोत्सव वसुबारस ते भाऊबीज दिवाळीचा आनंद ओसंडून वाहणार ........ सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. ४ ः वसुबारसच्या मंगलमय पर्वाने यंदाच्या दिवाळी सणाला गुरुवारपासून (ता. पाच) प्रारंभ होत असून, पुढचे सहा दिवस संपूर्ण परिसर रोषणाई आणि आनंदाने उजळून निघणार आहे. उद्यापासून थेट बुधवारी (ता. ११) होणाऱ्या भाऊबीजेपर्यंत हा तेजोमय दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. सणाच्या या पार्श्वभूमीवर बाजारपेठा पुरत्या सजल्या असून, नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे एक विशेष महत्त्व असून घरोघरी, दुकानांमध्ये आणि बाजारपेठेत या सणाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच गोवत्स द्वादशी (वसुबारस). या दिवशी सवत्स गाईची (वासरू आणि गाय) पूजा करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. घरोघरी गृहिणी सायंकाळी गाई-वासराची पूजा करून त्यांना पुरणपोळी व अन्नाचा घास भरवतील. ग्रामीण भागासह शहरी भागातही या पूजनासाठी विशेष उत्साह दिसून येत आहे. शुक्रवारी (ता. सहा) धनत्रयोदशीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा करून उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते. तसेच सोन्या-चांदीचे दागिने, भांडी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करण्यासाठी ही शुभ तिथी मानली जाते. यामुळे सराफा बाजार, इलेक्ट्रॉनिक्स दुकाने आणि भांडी बाजारात मोठ्या प्रमाणावर उलाढाल होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. रविवारी (ता. आठ) दिवाळीचा मुख्य दिवस असणार आहे. या दिवशी सायंकाळी घरोघरी, व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये आणि दुकानांमध्ये विधिवत लक्ष्मीपूजन केले जाईल. घरोघरी संध्याकाळी आकर्षक पणत्यांची रोषणाई, दारी सुरेख रांगोळ्या, आकाशात झळकणारे कंदील आणि फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळेल. व्यापारी वर्गासाठी लक्ष्मीपूजनाचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. दुकानांची टापटीप सजावट करून, झेंडूची फुले व आंब्याच्या पानांचे तोरण बांधून नवीन वहीखात्यांचे (चोपडी) पूजन केले जाईल आणि समृद्धीची प्रार्थना केली जाईल. मंगळवारी (ता. १०) दीपावली पाडवा साजरा केला जाणार असून, हा दिवस पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा मानला जातो. या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. तसेच नवीन व्यवसाय, वाहन खरेदी आणि नव्या कामाचा प्रारंभ करण्यासाठी पाडव्याचा मुहूर्त अत्यंत शुभ मानला जात असल्याने बाजारात खरेदीचा मोठा ओघ राहील. दीपोत्सवाची सांगता बुधवारी (ता. ११) भाऊबीज सणाने होईल. बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. या दिवशी भावाने बहिणीच्या घरी जाऊन ओवाळून घेणे आणि बहिणीला भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. भाऊबिजेनिमित्ताने मिठाईची दुकाने, कपड्यांची दुकाने आणि गिफ्ट शॉप्समध्ये ग्राहकांची मोठी गर्दी दिसेल. तसेच एसटी बस व वाहतूक सेवांवरही प्रवाशांची मोठी वर्दळ पाहायला मिळेल. ........ ((चौकट)) बाजारपेठेत तेजी; खरेदीसाठी झुंबड उद्यापासून सुरू होणाऱ्या या दीपोत्सवामुळे बाजारपेठांमध्ये पूर्णपणे सणासुदीचे वातावरण निर्माण झाले आहे. पणत्या, मडकी, आकाशकंदील, रांगोळीचे रंग, उटणे, सुगंधित तेले, झेंडूची फुले, कपडे आणि गोडधोड मिठाईच्या खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांच्या मंदीनंतर आता सणाच्या काळात मोठी आर्थिक उलाढाल होईल, अशी आशा स्थानिक व्यापारी व्यक्त करत आहेत. सर्वत्र पसरलेली दिव्यांची आरास, दारी सजलेल्या रांगोळ्या आणि आकाशात रंगणारा फटाक्यांचा प्रकाश यामुळे संपूर्ण परिसर दिवाळीच्या मंगलमय आनंदात न्हाऊन निघण्यासाठी सज्ज झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.