आजपासून दीपोत्सवाला सुरुवात

आजपासून दीपोत्सवाला सुरुवात
Published on: 
वसुबारसने दीपोत्सवाचा प्रारंभ रविवारी नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन; सणांमुळे बाजारपेठेत चैतन्य ----- बीड, ता. ४ : दीपोत्सवाला गुरुवारपासून (ता. पाच) सुरवात होत आहे. तिथींच्या विशेष योगामुळे यंदा सात दिवस सणांची धामधूम अनुभवायला मिळणार आहे. नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे मुख्य सण रविवारी एकाच दिवशी आले आहेत. सलग सण आणि सुट्यांमुळे नोकरदारांसह व्यापारी वर्गासाठी यंदाची दिवाळी अधिक आनंददायी ठरणार आहे. वसुबारसने दीपोत्सवाचा प्रारंभ होईल. यानिमित्त घरासमोरील अंगणे आकाशकंदील आणि पणत्यांच्या प्रकाशाने उजळतील. शुक्रवारी धनत्रयोदशी साजरी होणार आहे. या दिवशी धन्वंतरी पूजनासह धनाची पूजा करण्याची परंपरा आहे. त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेत सोने-चांदी, नवीन भांडी आणि पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. पंचांगानुसार कार्तिक अमावास्येला लक्ष्मीपूजन केले जाते. रविवारी सायंकाळी सहा ते रात्री आठ लक्ष्मीपूजनाचा मुख्य मुहूर्त आहे. याच दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करून नरक चतुर्दशी साजरी केली जाईल. सायंकाळी व्यापारी वर्गाकडून वहीपूजन आणि नव्या हिशेबाच्या चोपड्यांचे पूजन करून आर्थिक व्यवहारांना प्रारंभ केला जाईल. त्यानंतर सोमवारी गोवर्धन पूजन, मंगळवारी बलिप्रतिपदा (पाडवा), तर बुधवारी भाऊबीज साजरी होईल. ----- दीपोत्सवाचे वेळापत्रक पाच नोव्हेंबर : वसुबारस सहा नोव्हेंबर : धनत्रयोदशी आठ नोव्हेंबर : नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन नऊ नोव्हेंबर : गोवर्धन पूजन १० नोव्हेंबर : बलिप्रतिपदा (पाडवा) ११ नोव्हेंबर : भाऊबीज २१ नोव्हेंबर : तुळशी विवाह प्रारंभ ----- बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण शहरातील मुख्य रस्त्यांवर रांगोळी, पणत्या, आकाशकंदील आणि फटाक्यांचे स्टॉल सज्ज झाले आहेत. सलग सुट्यांमुळे नोकरदार वर्गासह ग्रामीण भागातील नागरिकही खरेदीसाठी बाजारपेठेत येत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून, यंदा व्यापारात मोठी उलाढाल होण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.