लातुरातून फराळ निघाला रशिया, कॅनडा, युक्रेनच्या

लातुरातून फराळ निघाला रशिया, कॅनडा, युक्रेनच्या
Published on: 
आली दिवाळी ----- लातूरचा फराळ रशिया, कॅनडाला रवाना ८० जणांनी पाठवला फराळ; डाक विभागाच्या आंतरराष्ट्रीय पार्सल सेवांना प्रतिसाद ----- सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. १ : दिवाळीचा सण अगदी जवळ आल्याने डाक विभागाच्या आंतरराष्ट्रीय पार्सल सेवांच्या माध्यमातून परदेशात शिक्षणासाठी राहत असलेल्या आपल्या मुलांना दिवाळीचा फराळ पाठवण्याची लगबग सुरू झाली आहे. गेल्या सहा दिवसांत ८० हून अधिक लातुरकरांनी परदेशात फराळ पाठवला आहे. सध्या कॅनडा, रशिया, युक्रेन येथे फराळ पाठवण्याला जास्त प्रतिसाद असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे परदेशात राहणाऱ्यांना मुलांना दिवाळीत आईने बनवलेल्या फराळाची चव अनुभवता येणार आहे. दिवाळी जवळ आली की डाक विभागाच्या वतीने विविध योजना जाहीर केल्या जातात. खासगी व्यावसायिकांच्या तुलनेने अत्यंत स्वस्त आणि विश्वासार्ह योजनांमुळे अनेक नागरिक डाक विभागाच्या योजनांना प्रतिसाद देतात. परदेशात आणि देशांतर्गत दिवाळीचा फराळ व भेटवस्तू पाठविण्यासाठी भारतीय डाक विभागाच्या आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत पार्सल सेवांना या आठवड्यात चांगला प्रतिसाद दिसून येत आहे. वैद्यकीय व अन्य शिक्षणासाठी कॅनडा, रशिया, युक्रेन येथे लातुरातील बरेच विद्यार्थी राहतात. त्यामुळे त्यांचे लातुरातील पालक त्यांना दिवाळीचा फराळ पाठवण्याची तयारी गेल्या काही दिवसांपासून करीत आहेत. आठवडाभरात ८० हून अधिक अधिक फराळाचे पार्सल पाठवण्यात आलेले आहे. याशिवाय, अमेरिका आणि इंग्लंड येथे नोकरी व अन्य कारणांसाठी राहणाऱ्या नातेवाईकांनाही फराळ पाठवला जात आहे. पण सध्या परदेशात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना फराळ पाठवण्याला जास्त प्रतिसाद आहे. परदेशात फराळ पाठवण्यासाठी पुढील १५ दिवस प्रतिसाद राहील, असे लातूर विभागाचे डाक अधीक्षक राजेश्वर बोटलावार आणि साहाय्यक डाक अधीक्षक श्रीकांत माने यांनी सांगितले. ----- २०० हून अधिक देशांमध्ये पाठवता येतात वस्तू वस्तू, व्यापारी माल व इतर उत्पादने योग्य पॅकिंग करून पार्सलाद्वारे पाठवण्याची सोय आमच्याकडे उपलब्ध आहे. पार्सलचे किमान वजन २५० ग्रॅम व कमाल ३५ किलो असू शकते. देशांतर्गत पार्सलचा साधारण वितरण कालावधी ३ ते ५ तर देशाबाहेर पार्सलचा कालावधी ६ ते १२ दिवसांचा आहे. लातूरमधून भारतातील विविध ठिकाणी तसेच २००हून अधिक देशांमध्ये वस्तू व व्यापारी माल ट्रॅकिंगसह किफायतशीर दरांत पाठविण्याची सुविधा भारतीय डाक विभागामार्फत उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच व्यापारी व व्यावसायिकांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले. --- असे आहेत दर (५० ग्रॅम ते ५ किलो) अमेरिका : ४०० इंग्लंड : २०० रशिया : २४५ जर्मनी : २४५ संयुक्त अरब अमिराती : १८५ ऑस्ट्रेलिया : ३९५ सिंगापूर : १८५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.