Diwali Festival : विना परवाना फटाका विक्रेत्यांविरोधात गुन्हे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali Festival

Diwali Festival : विना परवाना फटाका विक्रेत्यांविरोधात गुन्हे

औरंगाबाद : दिवाळीनिमित्त फटाके विक्रीच्या दुकानदारांनी पोलिस दल, अग्निशमन दलाची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र, अनेकांनी परवानगी न घेतल्याचा प्रकार समोर आला. यामुळे सातारा परिसरात तीन दुकानदारांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल केल्यानंतर संबंधित दुकानातून हजारो रुपयांचे फटाकेही जप्त करण्यात आले.

अमोल गणेश वानखेडे (३६, रा. छत्रपतीनगर, सातारा परिसर), शेख सादिक शेख जब्बार (२४, रा. देवळाई गाव, हबीब कॉलनी) आणि शेख बशीर शेख हुसेन (४९, रा. एसआरपीएफ कॅम्प रोड, सातारा परिसर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुकानदारांची नावे आहेत.

पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी सांगितले की, शहरात फटाके विक्रीसाठी स्थानिक पोलिस ठाण्यापासून ते सहायक पोलिस आयुक्त, उपायुक्त आणि पोलिस आयुक्त यांची परवानगी घ्यावी लागते. अग्निशमन दलाची एनओसी आणावी लागते.

स्फोटक पदार्थ विक्रीची ही दुकाने मानवी वस्तीत थाटता येत नाहीत. त्यासाठी वेगळ्या मैदानावर जागा उपलब्ध करून दिली जाते. तेथे अग्निशमन दलाचे बंब असतात. कोणतीही दुर्दैवी घटना घडली तर त्यात जीवित हानी होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. त्यासाठीची शासकीय फीस भरावी लागते.

मात्र, या दुकानदारांनी कुठलीही परवानगी न घेता मानवी वस्तीत फटाक्यांचे दुकान सुरू केले. तेथे कुठलीही काळजी घेतली नसल्याचे पाहणीत समोर आले. त्यामुळे पोलिस अंमलदार तुकाराम सोनुने यांच्या तक्रारीवरून छत्रपतीनगरात दुकान सुरू केलेल्या अमोल वानखेडेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या दुकानातून तब्बल ३६ हजार ६५० रुपयांचा माल जप्त केला आहे.

याशिवाय, अंमलदार रितेश जाधव यांच्या तक्रारीवरून शेख सादिकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने चाटे स्कूलजवळ दुकान थाटले होते. त्याच्या दुकानातून चार हजार ६२५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. तसेच, अंमलदार दीपक शिंदे यांच्या तक्रारीवरून शेख बशीरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने एसआरपीएफ कॅम्प रोडवर सातारा गावात दुकान थाटले होते. त्याच्या दुकानातून १३ हजार १९५ रुपयांचे फटाके जप्त केले आहेत.