Diwali Festival : दिवाळीसाठी वीस लाख पणत्या दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali Festival

Diwali Festival : दिवाळीसाठी वीस लाख पणत्या दाखल

औरंगाबाद : दिवाळी हा प्रकाशाचा सण. यामुळे घरोघरी लायटिंग, आकाश कंदील लावण्यात येतात. लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या पणत्यांना मोठी मागणी असते. यंदा दिवाळीसाठी सिलीगुडी, राजस्थान येथून वीस लाखांहून अधिक पणत्या विक्रीसाठी शहरात आल्या आहेत. गेल्या आठवड्यापासून बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे.

दिवाळीच्या पाच दिवस अगोदरपासून घरोघरी दिवे लावून दिवाळीच्या सणाला प्रारंभ होतो. बाजारातदेखील मातीपासून बनविलेल्या पणत्या सर्वाधिक घेतल्या जातात.

दरवर्षी पंधरा ते वीस लाख पणत्या बाजारात विक्रीसाठी येतात. यंदाही सिलीगुडी, राजस्थान, गुजरात, कलकत्ता या ठिकाणांहून मातीपासून बनविलेल्या पणत्या विक्रीसाठी आल्या आहेत. त्यांनाच पसंती मिळत असल्याचे विक्रेते कौशल सिंग यांनी सांगितले.

औरंगपुरा, चिकलठाणा, जळगाव रोड, पडेगाव, सेव्हन हिल, देवळाई चौक, शिवाजीनगर येथे लाल मातीपासून बनविलेल्या पणत्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत.३० रुपये डझन पासून ते ५० रुपये डझनपर्यंत पणती विक्री होत आहेत. महागाईमुळे वाहतूक खर्च वाढल्यामुळे किमती वाढल्या आहेत. पूर्वी २५ रुपयांत एक डझन पणत्या येत होत्या.

७५ प्रकारच्या डिझाइन

दीप, आकर्षक डिझाइन असलेल्या पणत्या यंदा घरोघरी दिसत आहेत. यावर्षी जवळपास ७५ प्रकारच्या आकर्षक डिझाइन असलेल्या पणत्या विक्रीसाठी आणल्या गेल्या आहेत. त्यात सिलीगुडी पणत्या, फिनिशिंग केलेल्या कलकत्ता येथील पणत्या, नारळवाला दिव्यासह आदी प्रकारच्या पणत्या बाजारात विक्रीसाठी आणल्या आहेत.

पारंपरिक पणत्या, मातीपासून बनविलेल्या पणत्या मोठ्या प्रमाणात ग्राहक खरेदी करत होते. परंतु अलीकडच्या काळात इलेक्ट्रॉनिक लायटिंग खरेदीवर भर दिला जाऊ लागला. याशिवाय नवनवीन प्रकारच्या दिव्यांची इलेक्ट्रॉनिक माळा बाजारात उपलब्ध आहेत.