रस्त्यावर फटाके उडवू नका,
अन्यथा होईल कारवाई
-------------------
हिंगोली, ता. ६ : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तात्पुरत्या फटाके विक्रीसह फटाके उडविण्याबाबत नियमावली जारी केली आहे. सार्वजनिक रस्ते, पदपथ अथवा रस्त्यापासून १० मीटरच्या आत फटाके उडविण्यास मनाई असून, उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा जिल्हा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
स्टॉलधारकांना परवान्याची मुदत संपल्यानंतर फटाक्यांची विक्री करता येणार नाही. शिल्लक साठा अधिकृत गोदामात किंवा घाऊक परवानाधारकाकडे परत जमा करणे बंधनकारक राहील. तात्पुरत्या फटाके स्टॉलच्या ५० मीटर परिसरात आतषबाजी करण्यास बंदी आहे. याशिवाय, विदेशी बनावटीचे फटाके विक्री करण्यासही मनाई केली आहे. सर्वोच्च न्यायालय आणि पर्यावरण संरक्षण नियमांनुसार, १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन, विक्री व वापरावर बंदी आहे. शंभरपेक्षा अधिक फटाके असलेल्या साखळी बॉम्बवर बंदी घातली आहे. विशिष्ट आकाराच्या ॲटमबाँबवरही कायदेशीर निर्बंध लागू राहतील.
------------
रात्री १० नंतर आवाजाचे फटाके उडविण्यास बंदी
ध्वनिप्रदूषण नियंत्रण नियमांनुसार, रात्री १० ते सकाळी सहा या वेळेत आवाज करणाऱ्या फटाक्यांवर बंदी असेल. केवळ बिनआवाजी फटाके आणि पर्यावरणपूरक ग्रीन फटाके उडविण्यास मुभा राहील. रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालयांच्या १०० मीटर परिसरात फटाके उडविण्यास मनाई आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे नोंदविले जातील. नियमांचे उल्लंघन होत असल्यास नागरिकांनी तत्काळ डायल ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.