दिवाळीत धाराशिवकर निवांत

दिवाळीत धाराशिवकर निवांत
Published on: 
दिवाळीत अग्निशमन दलाचीच ‘अग्निपरीक्षा’ सात दिवसांत १८ घटना; अपुरी साधने असतानाही जवानांनी मिळवले आगींवर नियंत्रण ----- धाराशिव, ता. १५ : शहरवासीय दिवाळीचा आनंद लुटत असताना फटाक्यांच्या आतषबाजीमुळे शहर आणि परिसरात आगीच्या घटनांचे सत्र सुरू होते. रविवार (ता. आठ) ते शनिवार (ता. १४) या सात दिवसांत धाराशिव शहर आणि परिसरात आगीच्या तब्बल १८ घटना घडल्या. यातील बहुतांश घटना फटाक्यांमुळे घडल्याचे सांगण्यात आले. अपुरी साधने आणि अवघ्या १२ कर्मचाऱ्यांच्या बळावर अग्निशमन दलाच्या जवानांनी अहोरात्र धावपळ करून आगी आटोक्यात आणल्या. त्यामुळे संभाव्य मोठे नुकसान टळले. ----- मोजके हात, पण धाडस अफाट धाराशिव अग्निशमन विभागात अवघे १२ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामध्ये आठ अग्निशमन कर्मचारी (एफएसटी) आणि चार वाहनचालकांचा समावेश आहे. यंत्रसामग्रीच्या बाबतीत विभागाकडे एक अग्निशमन बंब, एक छोटे बचाव वाहन आणि नुकताच दाखल झालेला एक तात्पुरता बंब अशी मर्यादित साधने आहेत. या साधनांच्या मदतीने जवानांनी दिवाळीच्या काळात दिवस-रात्र काम करीत नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडली. ----- आगींचा घटनाक्रम ८ नोव्हेंबर : शेकापूर येथे सोयाबीनच्या भुस्कटाला, कौडगाव एमआयडीसीत सौरऊर्जा प्रकल्पाजवळ आणि शहरातील पुष्पक मंगल कार्यालयाजवळ कचऱ्याला आग लागली. ९ नोव्हेंबर : बार्शी नाका परिसरात लाकडे व कचरा, येडशी येथे किराणा दुकान, कौडगाव एमआयडीसी आणि तुळजापूर येथे मंडपाच्या गोदामाला आग लागली. १० नोव्हेंबर : आयुर्वेदिक महाविद्यालय परिसर, शांतिनिकेतन कॉलनीतील १८ नंबर शाळा परिसर, गणेशनगर, टीपीएस स्कूल परिसरातील जंगल आणि तुळजापूर येथील भैरवनाथ मंदिराजवळील वाहनतळ तसेच नाज रेस्टॉरंट परिसरात आगीच्या घटना घडल्या. ११ नोव्हेंबर : समतानगरमधील आय हॉस्पिटल परिसरात गवताला, तर राघुचीवाडी येथे नारळाच्या झाडाला आग लागली. १२ नोव्हेंबर : येडशी येथे गादीच्या दुकानाला भीषण आग लागली, तर तेर येथील गॅरेजमध्ये आग भडकली. १४ नोव्हेंबर : धाराशिव शहरातील वैराग नाका परिसरात गवताला आग लागली. जवानांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. ----- मदतीच्या फोनला प्रतिसाद फटाक्यांची आतषबाजी आणि त्यातून उद्‍भवलेल्या दुर्घटनांमुळे अग्निशमन दलाची धावपळ उडाली. एकापाठोपाठ एक येणाऱ्या मदतीच्या फोनला प्रतिसाद देत जवानांनी प्रत्येक ठिकाणी धाव घेतली. येडशीतील गादीचे दुकान असो किंवा एमआयडीसीतील प्रकल्प, जवानांनी तत्परतेने प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. दिवाळीच्या सणात स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहून त्यांनी अहोरात्र सेवा बजावली. ----- येडशी येथील आगीच्या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेत अपुरी साधने असतानाही आम्ही घटनास्थळी पोचून आग आटोक्यात आणण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न केले. याशिवाय, विविध ठिकाणांहून आगीचे फोन येत होते. सात दिवसांत एकाही कर्मचाऱ्याला नीट झोप मिळाली नाही. घरी दिवाळीचा सण असतानाही रात्रंदिवस जागून आम्ही कर्तव्य बजावले. - संभाजी साळुंके, वाहनचालक- प्रभारी इन्चार्ज, अग्निशमन कार्यालय ----- धाराशिव : अग्निशमन विभागात तात्पुरत्या स्वरूपात दाखल झालेला बंब. OSM26-B07395

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.