फटाके उडवताना घ्या डोळ्यांची काळजी
सुरक्षित दिवाळीचा नेत्रतज्ज्ञांचा सल्ला, फटाक्यांमुळे डोळ्यांना कायमस्वरूपी इजा होण्याचा धोका
छत्रपती संभाजीनगर, ता. २ ः दिवाळीच्या उत्सवात फटाक्यांची आतषबाजी, रोषणाई आणि आनंदाच्या वातावरणात डोळ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी फटाके उडवताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन औरंगाबाद नेत्ररोगतज्ज्ञ संघटनेने केले आहे.
फटाके उडवताना होणाऱ्या अपघातांमध्ये लहान मुले व प्रौढांना डोळ्यांच्या गंभीर दुखापती होऊ शकतात. काही घटनांमध्ये डोळ्यांचे कायमस्वरूपी नुकसान होण्याचाही धोका असतो. फटाके उडवताना डोळ्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षित चष्म्याचा वापर करावा. फुलबाज्या, अनार किंवा भुईचक्रापासून किमान चार मीटर आणि आवाजाच्या फटाक्यांपासून किमान दहा मीटर अंतर ठेवावे. लहान मुलांनी फटाके एकट्याने उडवू नयेत. मोठ्यांच्या उपस्थितीतच सुरक्षित ठिकाणी फटाके उडवावेत. जळलेल्या काड्या आणि फटाके आटोक्यात आणण्यासाठी पाणी जवळ ठेवावे. फटाका पेटविताना डोळ्यांजवळ किंवा चेहऱ्याजवळ नेऊ नयेत. न पेटलेला फटाका पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न करू नये. अनार, भुईचक्र किंवा बॉम्ब हातात धरून पेटवू नयेत. तसेच काचेच्या बाटल्यांमध्ये फटाके फोडू नयेत. स्फोटामुळे काचेचे तुकडे डोळ्यांना गंभीर इजा करू शकतात. औरंगाबाद नेत्ररोगतज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉ. शुभा झंवर, सचिव डॉ. जगदीश लोया, कोषाध्यक्ष डॉ. अभिजित गोरे आणि वैज्ञानिक समितीच्या अध्यक्ष डॉ. अर्चना वरे यांनी नागरिकांना सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. आपत्कालीन मदतीसाठी १०८ किंवा ११२ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
-----------------
...तर घ्या तज्ज्ञांचा सल्ला
फटाक्यांमुळे डोळ्याला दुखापत झाल्यास डोळे चोळू नयेत किंवा दाब देऊ नये. डोळ्यांत कण गेल्यास पाणी मारून स्वतः उपचार करण्याचा प्रयत्न टाळावा. डोळ्याला स्वच्छ कापड किंवा पेपर कपने हलके झाकावे. डोळ्यांवर कोणताही दाब न देता तातडीने नेत्ररुग्णालयात जाऊन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे.