दिवाळीत घरगुती गॅससाठी वणवण
काळाबाजार रोखण्याची ग्राहकांची मागणी
-----
बीड, ता. ८ : दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असताना जिल्ह्यातील काही भागांत घरगुती गॅस सिलिंडरच्या वितरणाचा प्रश्न गंभीर आहे. सिलिंडर मिळविण्यासाठी सर्वसामान्यांना धावपळ करावी लागत असताना हॉटेल, ढाबे आणि व्यावसायिक आस्थापनांना घरगुती सिलिंडरचा पुरवठा होत असल्याचा आरोप काही नागरिकांचा आहे. या प्रकाराची प्रशासनाने दखल घेऊन सणासुदीत ग्राहकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी होत आहे.
घरगुती वापरासाठी सवलतीच्या दरात उपलब्ध होणारे सिलिंडर व्यावसायिक कामांसाठी वळविले जात असल्याचा आरोप ‘ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन’ने केला आहे. यासंदर्भात पुराव्यांसह प्रशासनाला निवेदने देऊनही जिल्हा पातळीवरील यंत्रणेकडून ठोस कारवाई होत नसल्याचा दावा संघटनेने केला आहे. घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर आणि संभाव्य काळाबाजार यामुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान होत असून, सर्वसामान्य ग्राहकांना हक्काचा सिलिंडर मिळविण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
दिवाळीच्या काळात महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांना सिलिंडरसाठीही वणवण करावी लागत आहे. हॉटेलचालकांना घरगुती सिलिंडर पुरविणाऱ्यांवर प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहक सुनील आरेकर यांनी केली.
सणाच्या दिवशी स्वयंपाकासाठी सिलिंडर मिळविण्यासाठी ग्राहकांना धावपळ करावी लागणे दुर्दैवी आहे. सवलतीच्या दरातील सिलिंडरचा गैरवापर करणाऱ्या गॅस एजन्सींचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी राजश्री इतापे यांनी केली.
-----
जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या काळाबाजाराबाबत व्यापक स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झालेल्या नाहीत. मात्र, नागरिकांकडे ठोस तक्रारी किंवा माहिती असल्यास त्याची तातडीने सखोल चौकशी करण्यात येईल. अनधिकृत व्यावसायिक वापर किंवा काळाबाजार आढळल्यास संबंधित गॅस एजन्सी आणि दोषी व्यक्तींवर कायदेशीर व कठोर कारवाई केली जाईल.
-प्रशांत सुपेकर, पुरवठा विभाग, बीड