भेटवस्तू, मिठाई, सुकामेव्याने बाजार सजला
आकर्षक भेटसंचांची रेलचेल; पारंपरिक मिठाईसह चॉकलेट, सजावटीच्या वस्तूंचे पर्याय
धाराशिव, ता. ४ : नात्यांतील गोडवा वाढविणाऱ्या दिवाळीच्या भेटींसाठी बाजारपेठा सजल्या आहेत. आप्तस्वकीय, मित्रपरिवार आणि व्यावसायिक सहकाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी मिठाई, सुकामेवा आणि विविध भेटवस्तूंचे पर्याय उपलब्ध आहेत. रंगीबेरंगी नक्षीदार डबे, लाकडी पेट्या आणि सजविलेल्या टोपल्यांतील भेटसंच ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
काजू कतली, पेढे, बर्फी, लाडू यासह विविध मिठाईचे मिश्र बॉक्स दुकानांमध्ये मांडण्यात आले आहेत. एकाच बॉक्समध्ये वेगवेगळ्या चवींचा आस्वाद घेता यावा, अशा पद्धतीने मिठाईचे संच तयार करण्यात आले आहेत. पारंपरिक मिठाईबरोबर चॉकलेट्स, कुकीज आणि खजुरापासून बनविलेल्या पदार्थांचेही पर्याय आहेत. कुटुंबासाठी मिठाई घेतानाच नातेवाइकांना देण्यासाठी स्वतंत्र लहान बॉक्स निवडण्याची सोय आहे.
सुकामेव्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, मनुके आणि खजूर यांच्या स्वतंत्र तसेच मिश्र पॅकची रेलचेल आहे. दोन, चार किंवा अधिक कप्प्यांच्या डब्यांमध्ये हे पदार्थ मांडण्यात आले आहेत. छोट्या पाकिटांपासून मोठ्या भेटसंचांपर्यंत उपलब्ध पर्यायांमुळे ग्राहकांना आपल्या खर्चाच्या नियोजनानुसार निवड करता येत आहे. मिठाई आणि सुकामेव्याला सजावटीच्या वस्तूंचीही जोड मिळाली आहे. पणत्या, सुगंधी मेणबत्त्या, तोरणे, छोट्या शोभेच्या वस्तू आणि शुभेच्छापत्रांचा समावेश असलेले संच लक्ष वेधत आहेत. भेट दिल्यानंतरही वापरता येतील असे डबे, ट्रे आणि टोपल्यांमुळे पॅकिंगलाही महत्त्व आले आहे. कर्मचारी, ग्राहक आणि व्यावसायिक सहकाऱ्यांसाठी एकसारखे भेटसंच घेणाऱ्यांना विविध आकारांतील पर्याय उपलब्ध आहेत.
.........
((कोट))
दिवाळीत ग्राहक शक्यतो किलोवर मिठाई खरेदी करतात. हा विचार करून तसेच भेट कोणाला द्यायची, ती किती दूर पाठवायची आणि पदार्थ किती दिवस टिकतील, याचा अभ्यास केलेला असतो. ग्राहक आता जागरूक झालेले आहेत. मिठाई घेताना तयार केल्याची तारीख, वापरण्याची मुदत आणि साठवणुकीच्या सूचना, तर सुकामेव्याच्या पॅकवर वजन व किंमत पाहून ते खरेदी करतात. ग्राहकांच्या बजेटनुसार छोटे आणि मोठे भेटसंच ठेवले आहेत. मिठाई व सुकामेव्याबरोबर आकर्षक पॅकिंगबाबतही विचारणा होत आहे.
- कमलकिशोर जोशी, मिठाई विक्रेते, धाराशिव