दिवाळीसाठी गावी जाताय? घर बंद ठेवताना सावधान!
---------------
घरांवर असते चोरट्यांची नजर; सुरक्षिततेबाबत पोलिस प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
-------
हिंगोली, ता. ६ : दिवाळी सणानिमित्त शहरातील अनेक कुटुंबे आपल्या मूळ गावी जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे शहरातील विविध सोसायट्या, भाड्याची घरे आणि कामगार वसाहतींमधील अनेक घरे काही दिवसांसाठी बंद राहणार आहेत. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांकडून बंद घरांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे दिवाळीच्या सुट्यांसाठी गावी जाताना नागरिकांनी घराच्या सुरक्षिततेबाबत विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
शहरात नोकरी, व्यवसाय किंवा मजुरीच्या निमित्ताने वास्तव्यास असलेली अनेक कुटुंबे दिवाळी साजरी करण्यासाठी गावी जातात. अनेकदा घरातील सर्व सदस्य एकाच वेळी बाहेर पडत असल्याने घरे अनेक दिवस बंद राहतात. अशा बंद घरांची पाहणी करून चोरटे चोरीची संधी शोधू शकतात. विशेष म्हणजे काही नागरिक गावी जाण्यापूर्वी किंवा प्रवासादरम्यान सोशल मीडियावर माहिती, छायाचित्रे आणि व्हिडिओ शेअर करतात. यामुळे घर बंद असल्याची माहिती अनोळखी व्यक्तींपर्यंत पोचण्याची शक्यता असते.
-------
अशी घ्या खबरदारी
गावी जाताना घराला मजबूत कुलूप लावावे. दागिने, रोकड आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात. विश्वासू शेजारी किंवा नातेवाइकांना घर बंद असल्याची माहिती द्यावी. सोसायटीतील सुरक्षा रक्षकांना पूर्वकल्पना द्यावी. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा यंत्रणा सुरू असल्याची खात्री करावी. घर बंद असल्याची माहिती सोशल मीडियावर टाकणे टाळावे. परिसरात संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवावे. सणाचा आनंद घेताना घराच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करू नये.
----------------
((कोट))
घरफोडी, चोरीच्या घटना रोखण्यासाठी गस्त वाढविण्यात आली आहे. शहराच्या विविध भागांसह औद्योगिक पट्ट्यातही पोलिसांची सतत गस्त सुरू आहे. कोम्बिंग ऑपरेशन राबविले जात असून, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी केली जात आहे. आपल्या परिसरात काही संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. नागरिकांनी गावी जाताना आपल्या घराच्या सुरक्षिततेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
- मोहन भोसले, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा