पालावरील कुटुंबांची उजळली दिवाळी
धारासुर मर्दिनी महिला फेडरेशनतर्फे साडी, फराळ वाटपाचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. ३ ः सामाजिक बांधिलकीची अनोखी परंपरा कायम राखत, धारासुर मर्दिनी महिला स्वयंसेवा संस्था (फेडरेशन) यांच्या वतीने यंदाही येडशी येथील पालावरील कुटुंबांसाठी साडी व फराळ वाटपाचा दिवाळी उपक्रम अतिशय उत्साहात पार पडला. त्यामुळे या कुटुंबांची दिवाळी उजळण्यास मदत झाली आहे.
येडशी परिसरातील पालावर राहणाऱ्या सुमारे १५० ते १७० कुटुंबांपर्यंत दिवाळीचा आनंद पोचवण्याचे काम या फेडरेशनने केले. फेडरेशनच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या १७ महिला मंडळांनी एकत्र येत हा प्रेरणादायी उपक्रम प्रत्यक्षात आणला. उपक्रमादरम्यान जेव्हा महिलांना साडी आणि दिवाळीचा फराळ सुपूर्द करण्यात आला, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आलेले समाधानाचे आणि आनंदाचे भाव उपक्रमाचे यश सांगत होते. या उपक्रमामुळे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आपुलकी आणि आनंदाचे क्षण पोचवता आल्याचे समाधान सहभागी महिलांच्या चेहऱ्यावरही स्पष्ट दिसत होते.
या संपूर्ण उपक्रमाचे यशस्वी नियोजन फेडरेशनच्या अध्यक्षा अनुराधा तोडकरी आणि उज्ज्वला आसलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यात डॉ. अनार साळुंखे, अंजली देशपांडे, डॉ. सुलभा देशमुख आणि ऊर्मिला तोडकरी या कार्यकारिणीने विशेष पुढाकार घेतला. या सामाजिक उपक्रमामध्ये १७ विविध मंडळांच्या अध्यक्षा, उपाध्यक्षासह एकूण ३५ महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवला. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हा उपक्रम खेळीमेळीच्या आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडला. भावसार, वीरशैव महिला मंडळ, राष्ट्र सेविका समिती, स्वयंवर योगा ग्रुप, गुरुवार महिला मंडळ, सावित्रीबाई फुले मंडळ, उद्योगिनी मंडळ, अन्नपूर्णा ग्रुप, तेजस्विनी, माहेश्वरी, कालिकादेवी, डॉक्टर आनंदी, वारकरी, अक्षरवेल, शिवाई, तसेच महालक्ष्मी महिला मंडळाने या उपक्रमात भाग घेतला.
.........
धाराशिव ः धारासुर मर्दिनी महिला स्वयंसेवा संस्थेतर्फे (फेडरेशन) येडशी येथील पालावरील कुटुंबांसाठी साडी व फराळ वाटपाचा दिवाळी उपक्रम राबविण्यात आला. यावेळी उपस्थित मंडळातील सदस्या.
फोटो क्रमांक ः OSM26B07319