ग्रामीण भागात दिवाळीचा आनंद ओसरला
----
गावी आलेले अनेक जण होताहेत पुन्हा पुणे-मुंबईकडे मार्गस्थ
---
जळकोट, ता. १३ (बातमीदार) : उत्साह आणि मांगल्याचे वातावरणात दिवाळीच्या प्रकाशपर्वाची सांगता बुधवारी (ता.११) भाऊबीजेच्या सणाने उत्साहात झाली. गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र दिवाळीचा उत्साह होता. घरोघरी लावलेल्या पणत्या, विद्युत रोषणाई, आकाशकंदील, रांगोळ्या, फटाक्यांची आतषबाजी, फराळाचा गोडवा यामुळे संपूर्ण तालुका दीपोत्सवाच्या रंगात रंगून गेला. मात्र, आता भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी अनेक जण पुण्या-मुंबईसारख्या शहराकडे मार्गस्थ होताना दिसत असून दिवाळीचा आनंद ओसरल्याचे चित्र आहे.
तालुक्यात दुष्काळी स्थिती असल्याने एकीकडे आर्थिक अडचणी असतानाही मार्ग काढत दिवाळीच्या पहिल्या दिवसापासूनच नवीन कपडे, मिठाई, फराळाचे साहित्य, पणत्या, पूजेचे साहित्य आणि सजावटीच्या वस्तूंच्या खरेदीला नागरिकांनी पसंती दिली. शहरासह ग्रामीण भागात घरोघरी आकर्षक आकाशकंदील, विद्युत रोषणाई करण्यात आली. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा हे दिवाळीतील सण पारंपरिक पद्धतीने साजरे करण्यात आले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराघरांत धनधान्याची पूजा करून सुख, समृद्धी आणि भरभराटीसाठी प्रार्थना करण्यात आली. दिवाळीच्या फराळात चकली, करंजी, लाडू, अनारसे, चिवडा यांसह विविध पदार्थांचा आस्वाद घेत नातेवाईक आणि मित्रमंडळींनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. दिवाळीच्या आनंदाला कौटुंबिक स्नेहाची जोड देणारा भाऊबीजेचा सणही उत्साहात साजरा झाला. बहिणींनी भावांना औक्षण करून त्यांच्या दीर्घायुष्य, सुखसमृद्धीची प्रार्थना केली. भावांनी बहिणींना भेटवस्तू देत प्रेमाचे नाते अधिक दृढ केले. नोकरी, व्यवसाय, शिक्षणानिमित्त बाहेरगावी असलेले भाऊ-बहिणी एकत्र आल्याने घराघरांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
-----------
डोळे पाणावू लागले
दिवाळीसाठी मोठ्या आनंदाने सासरहून माहेरी आलेल्या लेकीबाळी आता परतीच्या मार्गावर असून जाताना त्यांचे डोळे पाणावत आहेत. मामा-भाच्चे संवादही थंडावला आहे. लेकीबाळींना पाठवणी करताना नातेवाईकांचे डोळे पाणावत असल्याचे चित्र सध्या ठिकठिकाणी पाहावयास मिळत असून, अनेक जण नेहमीप्रमाणे रोजगारासाठी पुणे-मुंबईसारख्या शहराकडे मार्गस्थ होताना दिसत आहेत.
------------
मामा-भाच्चे संवाद थांबला
ग्रामीण भागात दिवाळीचा सण सर्वात मोठा मानला जातो. बच्चेकंपनी आपल्या मामाकडे तसेच गावाकडे सुट्या असल्याने आनंदात आलेले असतात. या काळात मामा-भाच्चे संवाद कानावर पडतात. आता त्यांच्या जाण्याने संवाद थंडावले असून लेकीबाळींसह आता अनेक तरुण कामासाठी शहराचा रस्ता धरत आहेत. सुटीसाठी गावाकडे आलेले परतीच्या मार्गावर आहेत. ग्रामीण भागातील दिवाळीचा आनंद ओसरल्याचे चित्र आहे.