रिअल इस्टेटला दिवाळीची झळाळी
कोट्यवधींची उलाढाल; अनेकांचे घर खरेदीचे स्वप्न होणार पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. ५ ः यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर धाराशिव शहरातील रिअल इस्टेट मार्केटमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. सणासुदीच्या या मांगल्यमय वातावरणात नागरिकांनी नवीन घरखरेदीला चांगला प्रतिसाद दिला असून, शहरातील २५ अपार्टमेंट आणि पाच रो हाऊसचे बुकिंग झाले आहे. यातून रिअल इस्टेट क्षेत्रात सुमारे १७ कोटी रुपयांची मोठी आर्थिक उलाढाल झाली असल्याची माहिती क्रेडाईच्या अधिकाऱ्यांनी दिली.
शहरातील वरूडा रोड, छायादीप लॉन परिसर, रेल्वे स्टेशन परिसर आणि सांजा रोड आदी परिसरांमध्ये नवीन घरे खरेदी करण्याकडे नागरिकांचा विशेष कल दिसून येत आहे. सद्यःस्थितीत शहरात नागरिकांच्या स्वप्नातील घर साकारण्यासाठी विविध १५ हून अधिक नामांकित स्कीम कार्यरत आहेत. या प्रकल्पांच्या माध्यमातून बाजारात एकूण ४५० नवीन फ्लॅट आणि ५० रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत, ज्यामुळे ग्राहकांकडे पर्यायांची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
........
२५ टक्के घरांची विक्री
क्रेडाईचे अधिकारी प्रदीप मुंडे यांनी सांगितले की, शहरातील नवीन प्रकल्पांमधील एकूण घरांपैकी २५ टक्के घरांची विक्री यापूर्वीच झाली आहे. सध्या एका अपार्टमेंटमधील फ्लॅटची किंमत सर्वसाधारणपणे ४० ते ६० लाख रुपयांपर्यंत आहे, तर विलासी आणि स्वतंत्र स्वरूपाच्या रो हाऊसची किंमत ७० ते ७५ लाख रुपयांच्या घरात आहे.
..........
‘फ्लॅट संस्कृती’चा विस्तार
शहरातील रिअल इस्टेटच्या या बदलाबाबत भाष्य करताना विकसक सचिन पाटील म्हणाले की, साईरामननगर आणि वरूडा रोड परिसरात नवीन घरे आणि प्लाॅट्स उपलब्ध आहेत. शहरात जमिनीचे (प्लाॅट) दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्यातच महसूल विभागाशी संबंधित ''वर्ग-२’चे विषय अनेक ठिकाणी प्रलंबित आहेत. त्यामुळे ज्या जागांचे टायटल आणि प्रॉपर्टी कायदेशीरदृष्ट्या पूर्णपणे क्लिअर आहेत, अशा ठिकाणच्या जमिनी आणि घरांच्या किमती आपोआपच वाढल्या आहेत. असे असले तरी प्लाॅटच्या किमतीत फ्लॅट उपलब्ध होत असल्याने त्यांच्या खरेदीकडे नागरिकांची कल आहे. आजच्या घडीला स्वतंत्र प्लॉट खरेदी करून त्यावर बांधकाम करणे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे राहिलेले नाही. स्वतंत्र प्लॉटच्या किमतीतच आता चांगल्या सोयी-सुविधांसह रेडीमेड फ्लॅट उपलब्ध होत असल्याने शहरात वेगाने ''फ्लॅट संस्कृती'' रुजताना आणि विस्तारताना दिसत आहे. दिवाळीच्या या मुहूर्तावर झालेल्या उलाढालीमुळे येत्या काळात धाराशिवचे बांधकाम क्षेत्र आणखी विस्तारण्याची चिन्हे आहेत.