अँकर
---
((आली दिवाळी लोगो)) (फोटो येणार आहे)
----
दिवाळीच्या खरेदीसाठी किराणा बाजारपेठ फुलली
------
दुकानांसह सुपर शॉपी, मॉलमध्येही ग्राहकांची गर्दी; फराळ साहित्याला सर्वाधिक मागणी
----
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. २९ ः दिवाळीचा सण अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरातील किराणा बाजारपेठेत खरेदीची लगबग वाढली आहे. दिवाळीच्या तयारीला महिनाभर आधीपासूनच सुरवात होत असली, तरी सण जवळ आल्याने आता किराणा मालाच्या खरेदीला वेग आला आहे. शहरातील किराणा दुकाने ग्राहकांच्या गर्दीने गजबजली असून, नव्याने सुरू झालेल्या सुपर शॉपी आणि मॉलमध्येही नागरिक मोठ्या प्रमाणावर खरेदी करताना दिसत आहेत.
दिवाळी म्हटले की घराची स्वच्छता, सजावट, नवीन कपड्यांची खरेदी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दिवाळीचा फराळ हे समीकरण ठरलेले असते. त्यामुळे सध्या गृहिणींकडून दिवाळीच्या फराळासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी तयार करून किराणा खरेदी केला जात आहे. चकली, चिवडा, करंजी, लाडू आणि शंकरपाळे यांसारखे पारंपरिक पदार्थ घरी बनविण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंना विशेष मागणी असल्याचे बाजारातील वातावरणावरून दिसत आहे. शहरातील किराणा दुकानांमध्ये पोहे, पातळ पोहे, भाजके शेंगदाणे, फुटाणे, खोबरे, डाळी, बेसन, रवा, मैदा, तांदळाचे पीठ, गव्हाचे पीठ, साखर, गूळ, रवा, तूप आणि खाद्यतेल यांसारख्या वस्तूंची खरेदी केली जात आहे. याशिवाय चकलीसाठी विविध प्रकारची पिठे, चिवड्यासाठी शेव, डाळ्या, काजू, बदाम, मनुका आणि इतर सुका मेवा यांनाही मागणी असते. करंजी व लाडू बनविण्यासाठी रवा, मैदा, साखर, गूळ, खोबरे आणि तूप या साहित्याची खरेदी केली जात आहे. दिवाळीला आता अवघे आठ दिवस शिल्लक असल्याने येत्या काही दिवसांत बाजारपेठेतील गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी नागरिकांकडून आवश्यक किराणा मालाची खरेदी लवकर पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. दिवाळीच्या स्वागतासाठी परभणीकरांची बाजारपेठेत सुरू असलेली ही लगबग आता अधिकच वाढू लागली आहे.
---
दुकानांसह सुपर शॉपीमध्येही गर्दी
दिवाळीच्या खरेदीसाठी अनेक ग्राहक आपल्या नेहमीच्या किराणा दुकानांना पसंती देत आहेत, तर काही ग्राहक एकाच ठिकाणी विविध वस्तू उपलब्ध होत असल्याने सुपर शॉपी आणि मॉलकडे वळत आहेत. मोठ्या प्रमाणात किराणा माल खरेदी करणाऱ्या कुटुंबांकडून सणासाठी लागणाऱ्या वस्तू एकत्रितपणे खरेदी करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे शहरातील विविध बाजारपेठांमध्ये दिवसभर ग्राहकांची वर्दळ दिसून येत आहे. किराणा खरेदीसोबतच मसाले, सुकामेवा, फराळासाठी लागणारे तयार साहित्य, पूजा साहित्य व मिठाई बनविण्यासाठी आवश्यक वस्तूंचीही खरेदी केली जात आहे.
---
फराळाच्या साहित्याला विशेष महत्त्व
दिवाळीच्या फराळात प्रत्येक घराची स्वतंत्र परंपरा असते. काही घरांमध्ये चकली, चिवडा आणि शंकरपाळे मोठ्या प्रमाणात तयार केले जातात, तर काही ठिकाणी करंजी, अनारसे आणि विविध प्रकारचे लाडू बनविण्याला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे फराळाच्या पदार्थांनुसार लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीचे प्रमाण बदलते. बेसन, रवा, मैदा, पोहे, शेंगदाणे, खोबरे, साखर, गूळ, तूप आणि खाद्यतेल या वस्तू दिवाळीच्या किराणा खरेदीतील महत्त्वाच्या वस्तू ठरत आहेत.