दिवाळी फराळातून टपाल कार्यालयास दीड लाखाचे उत्पन्न
----
विदेशात राहणाऱ्या बांधवांनाही घरगुती फराळाचा आस्वाद; पार्सलचा ओघ सुरूच
--
युवराज धोतरे
उदगीर, ता. १४ : दिवाळी फराळ पार्सलने जीपीओ टपाल कार्यालयास लखपती केले. अवघ्या पंधरा दिवसांत पार्सलमधून सुमारे दीड लाखाचे उत्पन्न कार्यालयास मिळाले. अद्यापही पार्सल करणाऱ्यांचा ओघ सुरू असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे टपाल कार्यालयाच्या तिजोरीत भर तर पडलीच. शिवाय, विदेशात राहणाऱ्या बांधवांनाही घरगुती फराळाचा आस्वाद घेता आला.
शिक्षण, नोकरी अशा विविध कारणांनी बहुतांशी शहरवासीय देश-विदेशात वास्तव्यास आहेत. दिवाळीसारख्या सणाला देखील घरी येणे त्यांना शक्य होत नाही. अशा बांधवांना कुटुंबाचा सहवास लाभावा. दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेता यावा. यासाठी त्यांच्या कुटुंबीयांकडून टपाल विभागाच्या पार्सल सेवेच्या माध्यमातून दिवाळी फराळाचे पार्सल त्यांच्यापर्यंत पोचविले जातात. यंदा देखील शेकडो दिवाळी फराळाचे पार्सल देश-विदेशात टपाल कार्यालयाच्या माध्यमातून पोच झाले. १ ते १४ नोव्हेंबपर्यंत जीपीओ टपाल कार्यालयाच्या माध्यमातून जगाच्या विविध देशांमध्ये ३० पार्सल पाठविण्यात आले. त्यातून जीपीओ टपाल कार्यालयास १ लाख ५० हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. अद्यापही नागरिकांचा फराळाचे पार्सल पाठवण्याचा ओघ सुरूच आहे. गुरुवारी देखील चार ग्राहकांकडून फराळाचे पार्सल विदेशात पाठविण्यासाठी बुक केले होते. टपाल कार्यालयाच्या माध्यमातून पोच झालेल्या दिवाळी फराळाचा आस्वाद घेणे देश-विदेशातील बांधवांना शक्य झाले.
--
रशिया, ग्रेट ब्रिटनमध्ये सर्वाधिक पार्सल
दरवर्षी अमेरिका, इंग्लड, रशिया या देशांमध्ये दिवाळी फराळाचे सर्वाधिक पार्सल पोच होत असतात. यंदा मात्र अमेरिकेत काही वस्तू पाठविण्यावर असलेल्या बंदीमुळे ग्रेट ब्रिटनमध्ये सर्वाधिक पार्सल पाठविण्यात आल्याची माहिती टपाल कार्यालयामार्फत देण्यात आली.