(दीपोत्सव लेख)
नातेसंबंध दृढ करणारी दिवाळी
-----
प्रकाशाचा सण आणि नातेसंबंध दृढ करणारी दिवाळी सर्वत्र आनंदाने आणि उत्साहाने साजरी केली जाते. बालगोपालांपासून आबालवृद्धांपर्यंत सर्वांना एकत्र आणणारा हा सण आहे. नोकरीनिमित्ताने बाहेरगावी राहणारे आप्तेष्ट, नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्य दिवाळीनिमित्त एकत्र येतात. त्यामुळे नात्यांमधील प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि ज्येष्ठांविषयीचा आदर अधिक दृढ होतो. आपली परंपरा आणि संस्कृती जपत नव्या पिढीलाही नातेसंबंधांचे महत्त्व समजावे आणि कौटुंबिक जिव्हाळ्याची वीण अधिक घट्ट व्हावी, यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
- संजय राऊत, जाफराबाद
-----
दिवाळी या नावातच आनंद आणि उत्साह सामावलेला आहे. दिवाळीचे दिवस म्हणजे नातेवाइकांच्या भेटीगाठी, भेटवस्तूंची देवाणघेवाण, मुलांसाठी फटाके आणि नवीन कपडे, दारातील रांगोळी, आकाशकंदील आणि पणत्यांची आरास. अशा विविध गोष्टींनी हा सण साजरा होत असला, तरी नातेसंबंध जोडून ठेवण्यासाठी या सणाला विशेष महत्त्व आहे. शुभसूचक रांगोळी, वाईट प्रवृत्ती दूर ठेवणारा आकाशदीप आणि अंधार दूर करून आयुष्यात प्रकाश पसरविणाऱ्या पणत्या या सर्वांमधून कुटुंबातील प्रत्येकाला काही ना काही शिकवण मिळते. पूर्वी ग्रामीण भागात संयुक्त कुटुंबपद्धती प्रचलित होती. दिवाळीनिमित्ताने कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन सणाच्या आनंदात सहभागी होत असत. दिवाळीच्या तयारीची लगबग महिनाभर आधीपासूनच सुरू होत असे. मातीची घरे पांढऱ्या मातीने सारवणे, भिंतींना मातीच्या रंगाने सुशोभित करणे, ही एक वेगळीच आनंददायी परंपरा होती. दिवाळी आली, की प्रत्येक भाच्याला ओढ लागायची ती मामाच्या घराची. वर्षभर कुटुंबापासून दूर राहिलेले सर्व जण एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करत फराळाचा आनंद लुटत असत.
वसुबारसेपासून सुरू होणाऱ्या दीपोत्सवात बहिणीकडून भावांना सुगंधी उटणे लावून अभ्यंगस्नान घातले जात असे. पूर्वीच्या काळापासून चालत आलेली दिवाळीत कानात तेल घालण्याची परंपराही आज ग्रामीण भागात काही ठिकाणी कायम आहे. आजी-आजोबा, सासू-सून, बहीण-भाऊ, नणंद-भावजय, पती-पत्नी व बालगोपाल, भाचे, पुतणे, नातवंडे असे कुटुंबातील सर्व घटक या सणात सहभागी होत असत. ज्येष्ठांचा आदर, लहानांवरील प्रेम, माया-ममता, महिलांविषयी आदरभाव आणि एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती अशा अनेक संस्कारांची शिकवण दिवाळीनिमित्ताने मिळत असे. यामुळे कुटुंबातील सदस्यांमधील संवाद वाढून परस्परांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही अधिक सकारात्मक होत असे. नातेसंबंध दृढ करण्यासाठी दिवाळीच्या सणाला मोठे महत्त्व होते. घरातील सर्व महिला एकत्र येऊन दिवाळीचा फराळ तयार करत असत. यानिमित्ताने एकमेकींकडून पाककृती शिकण्याची आणि अनुभवांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळत असे. त्याचबरोबर भावभावनांचे ऋणानुबंधही या सणानिमित्ताने अधिक घट्ट होत असत. कुटुंबातील प्रत्येक सदस्य महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक नात्याला योग्य तो मान देणे हे आपले कर्तव्य आहे, ही शिकवण ज्येष्ठांकडून अप्रत्यक्षपणे दिली जात असे. त्यामुळे मनामनांतील द्वेष, हेवेदावे आणि अपमानाच्या भावनांना फारसा थारा राहत नसे. म्हणूनच दिवाळी हा ऊर्जेचा, प्रकाशाचा आणि आनंदाचा सण मानला जात असे. आजही ग्रामीण भागात सण-उत्सवांनिमित्ताने कौटुंबिक संवाद घडून येतो. अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय व्हावा, या भावनेतून दिवाळी साजरी केली जाते. मात्र, ही परंपरा जोपासताना आपण आपल्या जवळच्या माणसांचे सुख आणि आनंद जपण्यासाठी किती प्रयत्न करतो, हा खरा चिंतनाचा विषय आहे. नातेसंबंध जपण्यासाठी घरातील महिला महिनाभर आधीपासूनच एकत्र येऊन फराळ तयार करत असत. त्यानंतर शेजारीपाजारी, नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या घरी स्वतः जाऊन फराळ दिला जात असे. दिवाळीनिमित्ताने विविध पदार्थांचा पाहुणचार करून दूर राहणारे नातेवाईक, विवाहित मुली आणि जावई यांना आवर्जून मूळ गावी बोलावले जात असे. सर्वांनी एकत्र जेवणे, गप्पा मारणे आणि जुन्या आठवणींना उजाळा देणे, यातून नात्यांमधील दुरावा कमी होत असे.
बहीण-भावाच्या नात्यातील आपुलकी आणि जिव्हाळा जपणारा सण म्हणून भाऊबीजेला विशेष महत्त्व आहे. बहिणीच्या प्रेमाचा आणि भावाच्या जिव्हाळ्याचा हा सण नात्यांमधील ओलावा कायम ठेवण्यास कारणीभूत ठरत असे. भाऊ विवाहित बहिणीच्या घरी जाऊन तिच्याकडून ओवाळून घेत असे. विवाहानंतरही बहिणीची माहेरशी असलेली नाळ जोडून ठेवण्याचे काम या सणाच्या माध्यमातून होत असे. मात्र, आजच्या काळात काही कुटुंबांमध्ये मालमत्तेच्या वाटणीवरून बहीण-भावांमध्ये वाद निर्माण होत असल्याचे चित्र दिसते. नात्यांमधील दुरावा वाढत असताना भाऊबीजेसारख्या सणांचे महत्त्व अधिकच अधोरेखित होते. पूर्वी अशा सणांच्या माध्यमातून नात्यांमधील दृढता वाढत असे. आज पुन्हा एकदा सण-उत्सवांच्या माध्यमातून नात्यांमधील हरवलेला संवाद आणि जिव्हाळा निर्माण करण्याची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले आहे. समाजमाध्यमांच्या माध्यमातून दररोज विविध संदेशांद्वारे भावभावना व्यक्त केल्या जात असल्या, तरी प्रत्यक्ष कुटुंबातील संवाद हरवत चालला आहे. त्यामुळे दिवाळीसारख्या सणांची आज अधिक गरज आहे. कारण, नात्यांमधील आपुलकी, प्रेम आणि जिव्हाळा केवळ समाजमाध्यमांवरील संदेशांपुरता मर्यादित राहत आहे. एकमेकांना वेळ देणे, प्रत्यक्ष भेटणे आणि संपूर्ण कुटुंबाने काही काळ एकत्र घालवणे, यातूनच नाती घट्ट होत असतात आणि ती जिवंत राहतात. दिवाळीनिमित्ताने कुटुंबातील ज्येष्ठांसह सर्व सदस्य एकत्र येतात. त्यांच्या सहवासात सहभागी होणाऱ्या चिमुकल्यांसाठी हा सण म्हणजे संस्कारांचे विद्यापीठच असते. दिवाळीनिमित्ताने सर्वांनी सकाळी लवकर उठणे, अभ्यंगस्नान करणे, स्वच्छ आणि सुगंधी कपडे परिधान करणे, देवासमोर दिवा लावणे अशा छोट्या-छोट्या कृतींतून मुलांवर संस्कार केले जात असत. दिवाळीच्या खरेदीत बालगोपालांसाठी नवीन कपडे आणि फटाके यांना विशेष महत्त्व असे. मात्र, कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या मनात दिवाळीचा अर्थ केवळ घराबाहेर दिवे लावणे एवढाच मर्यादित नव्हता, तर अंतर्मनातील ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करणे हाच खरा उद्देश होता. आपल्यातील नकारात्मकता, अज्ञान आणि द्वेष दूर करून प्रेमाचा आणि आनंदाचा प्रकाश पसरवणे, ही भावना मुलांच्या मनावर बिंबवली जात असे. त्यामुळे नात्यांमधील दुरावा कमी होऊन परस्परांतील प्रेम, आपुलकी व जिव्हाळा वाढत असे. आज कुटुंबांमध्ये संवाद हरवत चालला आहे. एकमेकांशी बोलण्याऐवजी प्रत्येक जण आपापल्या व्यवहारात आणि व्यवसायात मग्न झाला आहे. त्यातच आधुनिक तंत्रज्ञान आणि समाजमाध्यमांनी प्रत्येकावर वेगळीच भुरळ घातली आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्य मोबाइलमध्ये व्यस्त असल्याचे चित्र दिसते. त्यामुळे आई-वडील, पती-पत्नी आणि बहीण-भावांमधील संवाद कमी होत आहे. वैचारिक देवाणघेवाण आणि प्रत्यक्ष भेटीगाठींचा आनंद नव्या पिढीला मिळणेही दुरापास्त होत आहे. या हरवलेल्या संवादामुळे कौटुंबिक कलह वाढण्याची शक्यता निर्माण होत आहे. मानवी जीवनातील नाती सुंदर आणि सुसंस्कृत बनविण्यासाठी संवादाची मोठी गरज आहे. आजच्या आधुनिक युगात संवादाची विविध साधने उपलब्ध झाली आहेत. मोबाइलच्या क्रांतीमुळे दूरदेशी असलेल्या नातेवाइकांशी आवाजासह चित्रांच्या माध्यमातूनही सहज संवाद साधता येतो. मात्र, याच मोबाइलमुळे घरातील प्रत्यक्ष संवाद कमी झाला आहे. घरातील सदस्य एकाच छताखाली असूनही एकमेकांशी बोलत नसल्याचे चित्र दिसते. त्यामुळे संवाद हरवलेल्या कुटुंबांना पुन्हा एकदा पूर्वीच्या उत्साहाने साजऱ्या होणाऱ्या सण-उत्सवांची गरज आहे.
दिवाळीच्या सणात कुटुंबातील सदस्यांमध्ये विचारांची देवाणघेवाण होते, मनातील ताणतणाव दूर होतात आणि परस्परांमधील नातेसंबंध अधिक दृढ होतात. त्यामुळे सण-उत्सव पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे एकत्र येऊन साजरे होणे गरजेचे आहे. यातून कुटुंबातील प्रत्येक सदस्याला संवाद साधण्याची संधी मिळेल.