सातशे किलो सोनपापडी, चिक्की जप्त
मिठाई दुकानांवर अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष; कृत्रिम रंगमिश्रित हळद पावडर आणि मिरची पावडरचेही घेतले नमुने
----
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. २७ : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन सज्ज झाले असून, एका मिठाई दुकानातून तब्बल ७०० किलो सोनपापडी आणि मावा चिक्की जप्त करण्यात आली आहे. याबरोबरच कृत्रिम रंगमिश्रित हळद आणि मिरची पावडरचा २२१ किलोचा साठाही जप्त केला. ही कारवाई गेल्या तीन दिवसांत लातूर आणि उदगीर शहरात करण्यात आली.
घराघरांत आणि बाजारात दिवाळीची तयारी सुरू झाली आहे. दिवाळीनिमित्त बाजारात वेगवेगळ्या वस्तू येण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे अनेकांचे लक्ष आता खरेदीकडे वळू लागले आहे. त्यातच बनावट खाद्य पदार्थ नागरिकांना मिळू नये, याकडे अन्न व औषध प्रशासन लक्ष ठेवून असल्याचे दिसून येत आहे. उदगीर शहरातील एका स्वीट मार्टमधील १ लाख ९० हजार ३२० रुपयांची सोनपापडी आणि चिक्कीचा साठा जप्त करण्यात आला. याचे नमुने सध्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. त्याच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
बनावट आणि सुटे मसाले याकडेही अन्न व औषध प्रशासनाने लक्ष देण्यात सुरवात केली आहे. लातूरमधील एमआयडीसी भागात आणि उदगीरमध्ये एकूण ९ ठिकाणी छापा टाकून ३ लाख ४८ हजार रुपये किमतीचा २२१ किलो साठा जप्त केला. कृत्रिम रंगमिश्रित हळद आणि मिरचीचे नऊ नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत पाठवले आहेत. ही कारवाई सहायक आयुक्त पी. एस. काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी पी. जी. खाडे, एस. जे. बोचरे आदी अधिकाऱ्यांनी केली.
---