दिवाळीनंतर परतीचा प्रवास वेगात; बसस्थानकांसह रेल्वेस्टेशनही हाऊसफुल्ल!

दिवाळीनंतर परतीचा प्रवास वेगात; बसस्थानकांसह रेल्वेस्टेशनही हाऊसफुल्ल!
Published on: 
ABD26J83254 हिंगोली : दिवाळीनंतर गावी परतणाऱ्यांमुळे बसस्थानकात प्रवाशांची गर्दी कायम आहे. दिवसभरात सहा ते सात हजार प्रवासी येथून ये- जा करीत आहेत. दिवाळीनंतर परतीचा प्रवास वेगात - बसस्थानकांसह रेल्वे स्टेशनही हाउसफुल्ल; सरासरी सात हजार प्रवाशांची ये-जा हिंगोली, ता. १६ : दिवाळीचा सण संपल्यानंतर आता परतीच्या प्रवासाची लगबग सुरू झाली आहे. सणानिमित्त गावी आलेले चाकरमानी, विद्यार्थी आणि नागरिक पुन्हा नोकरी, व्यवसाय तसेच शिक्षणाच्या ठिकाणी परतू लागल्याने बसस्थानकांसह रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दिवाळी होऊन चार दिवस उलटले तरी प्रवाशांची गर्दी कायम आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन एसटी महामंडळाच्या हिंगोली आगाराने प्रमुख मार्गांवर जादा बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे. छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, लातूर, बीड, परभणी, नांदेड या मार्गांवर जादा बस सोडण्यात येत आहेत. तसेच एखाद्या मार्गावर प्रवाशांची संख्या वाढल्यास ऐनवेळी अतिरिक्त बस सोडण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हिंगोली शहरासह वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ आणि सेनगाव येथील बसस्थानकांवरही प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी येणारे प्रवासी तसेच परगावी जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. दिवाळीच्या सुट्ट्या संपत असल्याने पुढील चार दिवस गर्दी कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, एसटी महामंडळाने यंदा दिवाळीत हंगामी भाडेवाढ न केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसह विविध घटकांना मिळणाऱ्या तिकीट सवलतींमुळे एसटी प्रवासाला पसंती मिळत आहे. परिणामी, बहुतांश मार्गांवरील बस प्रवाशांनी भरून धावत आहेत. दुसरीकडे, खासगी ट्रॅव्हल्सकडून हंगामी भाडेवाढ करण्यात आली असून, काही कंपन्यांकडून नियमांचे उल्लंघन करून जादा भाडे आकारले जात असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. ----------- चौकट संभाजीनगरसाठी चार, तर पुणे मार्गावर तीन जादा फेऱ्या परतीच्या प्रवासात छत्रपती संभाजीनगर, पुणे, लातूर, बीड, नांदेड, परभणी या मार्गांवर सर्वाधिक गर्दी होत आहे. त्यामुळे या मार्गांवरील बसफेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली असून, प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी आगार प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. सध्या पुणे मार्गावर तीन, छत्रपती संभाजीनगरसाठी चार जादा फेऱ्या सोडण्यात येत आहेत. ------------ चौकट पॅसेंजरसह एक्स्प्रेस रेल्वेगाड्या फुल्ल अकोला ते पूर्णा मार्गावरून हिंगोलीमार्गे धावणाऱ्या अकोला ते पूर्णा, अमरावती ते तिरूपती, अकोला ते काचीगुडा, नरखेडा ते काचीगुडा, इंदौर ते यशवंतपूर, अजमेर ते हैद्राबाद, श्री गंगानगर ते नांदेड, अमृतसर ते नांदेड, उना ते नांदेड, जयपूर ते सिकंदराबाद, नागपूर ते कोल्हापूर, अमरावती ते पुणे या रेल्वेगाड्यांत गर्दी वाढली आहे. बहुतांश रेल्वेचे आरक्षण फुल्ल आहे. ----------- प्रतिक्रिया दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. लांब पल्ल्याच्या मार्गावर प्रवाशांची संख्या अधिक असल्याने फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. सध्या परतीच्या प्रवासामुळे गर्दी वाढत असून, त्यानुसार अतिरिक्त बसफेऱ्यांचे नियोजन केले जात आहे. - अनंत धर्माधिकारी, आगार व्यवस्थापक, हिंगोली ----------- प्रतिक्रिया खासगी ट्रॅव्हल्स चालकांना हंगामी भाडेवाढ पन्नास टक्यांपर्यंत करता येते. परंतु, प्रत्येकाने नियमात राहून भाडे आकारणे आवश्यक आहे. नियमाला बगल देत कुणी अधिकचे भाडे घेत असेल तर प्रवाशांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे तक्रार करावी. त्या तक्रारीची शहानिशा करून कारवाई करण्यात येईल. तसेच दिवाळीच्या अगोदरपासून नियमित तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. - सतीश जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी -------- प्रतिक्रिया दिवाळी सणानिमित्त गावी आलेल्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे बसस्थानक, रेल्वेस्थानकावर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. ही गर्दी लक्षात घेता राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जादा बसफेऱ्या सोडाव्यात. तसेच दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या वतीने अकोला- पूर्णा मार्गावरही रेल्वे गाड्यांची संख्या वाढविण्यात यावी. - गणेश साहू, प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.