दिवाळीनिमित्त वाहन बाजारपेठेत ‘धमाका’
------
हायब्रीड वाहनांच्या खरेदीची क्रेझ अन् डिस्काउंटची खैरात
-----
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. ३१ ः दिवाळीच्या शुभमुहूर्तावर धाराशिवची वाहन बाजारपेठ पूर्णपणे बहरली असून, शोरूम्समध्ये खरेदीसाठी ग्राहकांची मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. पाडवा आणि भाऊबीज या मुहूर्तांचे औचित्य साधत वाहन खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी आधीपासूनच बुकिंगचा धडाका लावलेला आहे. यंदाच्या सणासुदीच्या काळात ऑटोमोबाइल क्षेत्रात सकारात्मक वातावरण असून, ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडींमुळे बाजारात नवीन ट्रेंड्स पाहायला मिळत आहेत.
कॉम्पॅक्ट एसयूव्हीला सर्वाधिक पसंती
हॅचबॅक किंवा सेडान कार्सच्या तुलनेत ग्राहकांचा कल ‘कॉम्पॅक्ट एसयूव्ही’कडे सर्वाधिक वाढला आहे. विविध कंपन्यांच्या गाड्यांना तरुणाईकडून व कुटुंबांकडून मोठी मागणी आहे.
-----
इलेक्ट्रिक वाहनांसह हायब्रीडचा बोलबाला
इंधनाचे वाढते दर आणि पर्यावरणपूरक पर्यायांमुळे मागीलवर्षीच्या तुलनेत दुचाकी तसेच चारचाकी विभागात इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी वाढली आहे. विशेषतः हायब्रीड वाहनांना म्हणजेच सीएनजी विथ पेट्रोल, बॅटरी (इलेक्ट्रिक) विथ पेट्रोल अशा पर्याय असलेल्या वाहनांच्या खरेदीकडे ग्राहकांचा ओढा स्पष्टपणे दिसून येत आहे. मायलेजचा विचार करणाऱ्या मध्यमवर्गीय ग्राहकांकडून ‘फॅक्टरी-फिटेड सीएनजी’ वाहनांची खरेदी, नोंदणी सुरू आहे.
------
सवलतींचा वर्षाव
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांकडून आणि स्थानिक डीलर्सकडून बंपर डिस्काउंट्स जाहीर करण्यात आले आहेत. विविध कार मॉडेल्सवर ५० हजार रुपये ते थेट एक लाख ४५ हजार रुपयांपर्यंतच्या कॅश डिस्काउंट, एक्स्चेंज बोनस आणि स्क्रॅपेज ऑफर्स दिल्या जात आहेत. ई-कार्स आणि स्कूटर्सवर विविध फायदे तसेच मोफत एक्सटेंडेड वॉरंटी दिली जात आहे. याशिवाय दुचाकींसाठीही १० ते २० हजार रुपयांपर्यंचा डिस्काउंट दिला जात आहे.
------
आकर्षक फायनान्स ऑप्शन्स
बँकांकडून कमी व्याजावर कर्ज, झिरो डाउनपेमेंट आणि झटपट मंजुरी यांसारख्या सुविधांमुळे मध्यवर्ती व ग्रामीण भागातूनही वाहनांची खरेदी, डाउन पेमेंट करून बुकिंग होत आहे. तसेच ऑनलाइन सुविधेमुळे पासिंगही लवकर होत असल्याची स्थिती आहे.
-------
४५ कोटींच्या उलाढालीचा अंदाज
होंडा शोरूमचे प्रमुख अमित मोदानी यांनी मागीलवर्षीप्रमाणेच वाहन खरेदीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. विक्रीत सुमारे २५ टक्के ते ३० टक्के वाढ झालेली आहे. जिल्ह्यात एकूण ४५ कोटींची उलाढाल होईल, असा अंदाज आहे. त्यात चारचाकी वाहन विक्रीतून २५ कोटी, तर दुचाकी विक्रीतून २० कोटींची उलाढाल होईल.