आगमनाला डीजेला फाटा

आगमनाला डीजेला फाटा
Published on
विसर्जनातही ‘डीजेमुक्त’ मिरवणुकीची अपेक्षा ९८ मंडळांचे पारंपरिक वाद्यांना प्राधान्य; कला व संस्कृतीचे दर्शन घडणार ----- धाराशिव, ता. २० : गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाला फाटा देत धाराशिव शहरातील तब्बल ९८ गणेश मंडळांनी यंदा डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांच्या गजरात लाडक्या गणरायाचे उत्साहात स्वागत केले. ढोल-ताशा, लेझीम, झांज आदी पथकांच्या तालावर तरुणाईने धरलेला ठेका आणि भक्तिमय वातावरणामुळे गणेश आगमन मिरवणुकांना वेगळे स्वरूप आले. आता हाच समंजसपणा आणि सामाजिक भान विसर्जन मिरवणुकीतही कायम ठेवावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. ----- पारंपरिक वाद्यांचा आदर्श शहरात १२१ सार्वजनिक गणेश मंडळांकडून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्यापैकी ९८ प्रमुख मंडळांनी गणेश आगमनावेळी पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांना पसंती दिली. डीजेचा दणदणाट नसतानाही तरुणाईचा उत्साह कमी झाला नाही. उलट आबालवृद्धांनी ढोल-ताशा, लेझीम आणि झांजांच्या तालावर मनसोक्त आनंद लुटला. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाला आळा बसण्यासोबतच पारंपरिक कला व संस्कृतीचे दर्शनही घडले. ----- ‘डीजेमुक्त’ मिरवणुकीची अपेक्षा आगमनावेळी डीजेला फाटा देऊन धाराशिव शहरातील मंडळांनी सकारात्मक संदेश दिला आहे. आता विसर्जन मिरवणुकीतही हीच परंपरा कायम ठेवावी, अशी अपेक्षा ज्येष्ठ नागरिक, महिला आणि पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. विसर्जन मिरवणुकांमध्ये रात्री उशिरापर्यंत होणाऱ्या कर्णकर्कश आवाजामुळे लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांना त्रास होतो. त्यामुळे मंडळांनी विसर्जनावेळीही डीजे टाळून पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे, अशी धाराशिवकरांची अपेक्षा आहे. ----- आम्ही पहिल्यापासूनच लेझीम, टिपरी, महिलांचे ढोलपथक आणि पारंपरिक वाद्यांच्या साथीने मिरवणूक काढतो. डीजे लावतच नाही. गेल्या दोन वर्षांपासून मिरवणुकीत नृत्य आणि नाटिकांचा समावेश करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. यातून सामाजिक प्रबोधन होत असल्याने नागरिकांकडून त्याचे कौतुक होत आहे. इतर मंडळांनीही अशाच पद्धतीने मिरवणुका काढून डीजेमुक्तीचा संदेश द्यावा. -डॉ. रोहन झाडे, सदस्य, त्रिमूर्ती गणेश मंडळ, गुजर गल्ली ----- आम्ही डीजेशिवाय विसर्जन मिरवणूक काढणार आहोत. ‘कल्लोळ’ हा ढोल-ताशा वादनाचा कार्यक्रम सादर करून मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीत डीजे वापरण्यास आमचा विरोधच आहे. -सचिन जगदाळे, श्री साई परिवार गणेश मंडळ ----- आम्ही पूर्वीपासूनच लेझीम पथकाच्या वादनासह गणरायाची विसर्जन मिरवणूक काढतो. डीजेमुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, लहान मुलांसह सर्वांनाच त्रास होतो. त्यामुळे मिरवणुकीत डीजे वापरू नये. पारंपरिक कला प्रकारांना मिरवणुकीत स्थान देऊन लोकजागृती करण्याची गरज आहे. -प्रा. भालचंद्र हुच्चे, मार्गदर्शक, बाल हनुमान गणेश मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com