विवाहितेस मारहाणप्रकरणी
पती, सासूवर गुन्हा दाखल
परभणी, ता. १४ ः लग्नाच्या दहा वर्षांनंतर व दोन मुले असताना पत्नीला तू दिसायला चांगली नाहीस, तुझ्या आई-वडिलांनी लग्नात मानपान दिला नाही म्हणून सतत शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या पतीसह सासूवर शुक्रवारी (ता.१३) कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी मुळच्या भिवंडी (जि.ठाणे) येथील व सध्या शहरातील भिमनगर येथे राहणाऱ्या पुजा विजय भगरे यांनी शुक्रवारी (ता.१३) कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. आपले लग्न २०१६ मध्ये पनवेल येथे झाले असून आपणास एक नऊ वर्षाची मुलगी व पाच वर्षाचा मुलगा अशी दोन अपत्ये आहेत. लग्नानंतर सासरच्या लोकांनी दोन वर्ष चांगले वागवले व त्यानंतर मात्र पती विजय भगरे व सासू सरस्वती हरिदास भगरे यांनी त्रास देण्यास सुरुवात केली. माहेरावरून घरखर्चासाठी पैशाची मागणी करून सतत मानसिक व शारीरिक त्रास दिल्या जात होता. उपाशीपोटी ठेवल्या जात होते. आपले आईवडील मजुरीचे काम करतात, त्यांच्याजवळ एवढे पैसे नाही, असे सांगितले तरी पैसे नाही आणलेस तर तुला खतम करू अशी धमकी देखील दिली. नातेवाइकांनी, आई-वडिलांनी भांडण मिटवण्यासाठी अनेकवेळा बैठका घेतल्या परंतु सुधारणा झाली नाही. सध्या आपण माहेरी राहात असून २४ सप्टेंबर २०२६ रोजी भावासोबत भीमनगर येथे आले. पाच ऑक्टोबर रोजी भरोसा सेलकडे तक्रार अर्ज दिला. तीनही बैठकीला सासरचे आले नाहीत व फोन केला असता आम्हाला नांदवायचे नाही, असे म्हणत आहेत. त्यानंतर भरोसा सेल येथून सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी बंद पाकिटात पत्र कोतवाली पोलिस ठाण्यास दिले आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून पती विजय व सासू सरस्वती यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
-------------------