
औरंगाबाद - महाराष्ट्रात आम्ही नवे सरकार बनविले आहे. मात्र सक्तवसुली संचालनालय (ईडी) किंवा अन्य शासकीय तपास यंत्रणांच्या कारवायांना घाबरून आमच्याकडे कोणीही आलेले नाही. जर तसे कोणी म्हणत असेल तर ते साफ चुकीचे आहे. ईडीच्या कारवायांना घाबरून आमच्याकडे किंवा भाजपमध्ये कुणी येत असतील तर येऊ नका, अशी विनंती करतो, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आणि सूडबुद्धीने कारवाया होत असल्याच्या विरोधकांच्या आरोपांचे खंडन केले.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतील घरांवर रविवारी ‘ईडी’ने छापे टाकले. त्यावर ‘खोटी कारवाई... खोटे पुरावे.. मी शिवसेना सोडणार नाही.. मरेन पण शरण जाणार नाही’ असे ट्विट करत राऊत यांनी आव्हान दिले. ईडी कारवाईच्या भीतीपोटीच शिवसेनेचे खासदार, आमदार शिंदे गटात जात असल्याचा आरोपही विरोधकांकडून केला जातोय. यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदेंनी हे स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, की ‘ईडी’ ही स्वतंत्र तपास यंत्रणा आहे. मी काही ‘ईडी’चा अधिकारी नाही. राऊत हे महाविकास आघाडीचे मोठे नेते होते. ''मला काही भीती नाही. मी चौकशीला सामोरा जाईन’ असे ते सतत म्हणत असतात. आता चौकशी सुरू आहे. चौकशीतून निष्पन्न होईल ते दिसेलच, कर नाही त्याला डर कशाला, असा सवाल शिंदे यांनी केला.
‘ईडी’ कारवाई टाळण्यासाठी आपल्याकडे लोक येत असल्याची टीका होत असल्याबद्दल विचारल्यावर ते म्हणाले, आम्ही नवीन सरकार स्थापन केले. कोणीही ईडीच्या भीतीने आले नाही. अर्जुन खोतकर असो किंवा अन्य कोणीही. ‘ईडी’ची कारवाई होते म्हणून आमच्याकडे येऊ नका, भाजपमध्ये जाऊ नका. कोणावरही दबाव टाकून त्यांना आमच्याकडे घ्यायचे नाही. केंद्रीय तपास यंत्रणांनी सूडबुद्धीने कारवाई केली असती तर न्यायालयाने संबंधितांना दिलासा दिला असता अशा शब्दांत त्यांनी विरोधकांच्या आरोपांचे खंडन केले.
दिल्लीचे कशाला विचारता?
मुख्यमंत्री शिंदे औरंगाबादचा दौरा अर्ध्यावर सोडून शनिवारी रात्री दिल्लीला गेले व आज सकाळी पुन्हा परतले. अचानक दिल्लीला जाण्याचे कारण विचारल्यावर शिंदे म्हणाले, ‘‘आता मी औरंगाबादमध्ये आहे, तेव्हा दिल्लीचे कशाला विचारता, मराठवाड्यातील विचारा’. सरकार अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण करील आणि पुढील निवडणूकही जिंकेल, असा विश्वासही शिंदे यांनी अन्य एका प्रश्नावर व्यक्त केला.