‘विद्यार्थ्यांकडून शुल्क वसुलीसाठी सक्ती करू नका’
नांदेड : जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी व शेतमजूर कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शिक्षण अबाधित राहावे आणि आर्थिक अडचणींमुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील खासगी शिकवणी वर्ग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे आणि शैक्षणिक संस्थांनी सामाजिक बांधिलकी जपत सहकार्य करावे. शेतकरी व शेतमजूर कुटुंबांतील विद्यार्थ्यांकडून शुल्क वसुलीसाठी सक्ती करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी वारंवार तगादा लावू नये. आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास होईल किंवा त्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होतील, असे वर्तन टाळावे. संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन शुल्क भरण्यास मुदतवाढ देणे, टप्प्याटप्प्याने शुल्क स्वीकारणे आणि शक्य असेल तेथे शुल्कात सवलत देणे, अशा पर्यायांचा विचार करावा. संकटाच्या काळात विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे खासगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस आणि शैक्षणिक संस्थांच्या संचालकांनी सहानुभूतीपूर्वक भूमिका घेऊन आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.